ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या पार्थिवावर काल मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील काही चारदोन मोजके दिग्गज चेहरे दिसले. पण बहुतेक अपेक्षित चेहरे गैरहजर दिसले. रेखापासून माधुरी, काजोलपर्यंत सर्वांना स्वर देणाऱ्या लता दीदींच्या अंत्यसंस्काराला यापैकी कुणीही दिसलं नाही. काही चाहत्यांच्या नजरेतून हे सुटलं नाही. सोशल मीडियावर याची चर्चा झाली नसेल तर नवल. शिवाजी पार्कवर आज कलाकारांना प्रवेशबंदी होती का? असा सवाल काही एका युजरने सोशल मीडियावर विचारला. त्याच्या या प्रश्नाला मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिनं दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा आहे.
या युजरच्या पोस्टवर कमेंट करताना हेमांगी कवीने शिवाजी पार्कवरचा कालचा स्वत:चा अनुभव शेअर केला आहे. लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी विशेषत: मराठी कलाकार दिसले नाहीत, यावर ‘सरकारी प्रोटोकॉल आड आले,’असं उत्तर हेमांगीने दिलं आहे.हेमांगी लता दीदींच्या अंत्यदर्शनाला शिवाजी पार्कवर पोहोचली होती. पण अनेक तास गेटवर ताटकळत राहण्याची वेळ तिच्यावर आली.
प्रोटोकॉल आड आले...सरकारी प्रोटोकॉल आड आले. मला गेटमधून जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि त्यांनी मला लपून लपून कसाबसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर 4 वाजल्यापासून तिथं होतां. शेवटपर्यंत विनंती करूनही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांनाही मागे हटकलं जात होतं, तिथे माझी काय गत.
आम्ही तिथे कुणी सेलिब्रिटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होता. आम्हाला ही शासकीय प्रोटोकॉल कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हाला सांगितलं की वेळ नाहीये. आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरश: भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं. कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं..., अशी कमेंट हेमांगीने केली आहे.