मी गवाक्ष आहे... इहलोकातून परलोकात येणाऱ्या असंख्य माणसांना कायम पाहत असतो. मात्र, पृथ्वीवरील रत्ने मृत्यूलोकांत आलेली पाहिली की, आमचाही ऊर अगदी भरून येतो. ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी ब्रह्मांडावर आपल्या जादुई आवाजाची मोहिनी असणाऱ्या सप्तस्वरांच्या आणि सुरांच्या सम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या लतादीदी यांचे आगमन परलोकात होत आहे म्हटल्यावर एक क्षण बधीरच व्हायला झाले. गानसम्राज्ञीचे पहिले पाऊल परलोकात पडणार म्हटल्यावर अंगावर काटाच उभा राहिला. तब्बल ६ दशकांहून अधिक कारकीर्द गाजवून, चार पिढ्यांना गाण्याने, संगीताने तृप्त करून आता त्या परलोकात येत आहेत, याची साधी कल्पना आम्हीही कधी केली नव्हती. मात्र, पृथ्वीवरील अटळ गोष्ट म्हणजे इहलोकाची यात्रा संपवून परलोकाच्या प्रवासाला निघणे होय.
गवाक्षात संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे तसेच आपापला काळ गाजवून, कारकीर्द घडवून येथील प्रवास सुरू केलेले कवी, संगीतकार यांची लगबग सुरू आहे. त्यांच्या जोडीला पु. ल. देशपांडे, भीमसेन जोशी यांच्यासह विश्वनाथ मोरे, दत्ता डावजेकर, वसंत देसाई, वसंत पवार, आर.डी.-एस.डी.बर्मन, नौशाद, सी.रामचंद्र, रोशनजी मदन-मोहन, शंकर-जयकिशन, दिलीप कुमार, भूपेन हजारिका, सज्जाद हुसैन, अली अकबर खाँ, गुलाम मोहम्मद, मोहम्मद रफी अशी संगीतातील आणि कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळी स्वरसम्राज्ञी आता येतेय म्हटल्यावर अगदी बेचैन झाली होती. प्रत्यक्ष मंगेश देवालाही ही गोष्ट अत्यंत कठीण गेली असेल. चित्रगुप्तालाही देवदूतांना पृथ्वीवर जाण्याच्या सूचना देताना एखादा हुंदका आला असेल. या सगळ्या गडबगडीत मात्र दीनानाथजी दूर एका कोपऱ्यात बसले आहेत. कारण, इहलोकातील प्रवास संपवून परलोकाची यात्रा आपली लाडकी लेक करतेय, हे कुठल्याही वडिलांना कसे पचावे. शेवटी काही असेल तरी एका बापाचं काळीज ते, त्यांचेही लक्ष कशातच नाही. माईच शेवटी त्यांना धीर देत आहेत. तुमचे नाव खाली पडू दिले नाही, अपार कष्ट सोसून प्रचंड यश मिळवले, भावंडांना सांभाळले, अशा काही आठवणी सांगतायत.
इहलोकातून प्रचंड लोकांच्या शुभेच्छा घेऊन परलोकाच्या प्रवासाला निघताना लता दीदी आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांचीच जुनी गाणी ऐकत होत्या, असं सांगितलं जातंय. यावरून मुलीचं वडिलांवर असलेलं प्रेम आणि जणू काही वडिलांनीच आता आपल्याला या दूरच्या प्रवासासाठी न्यायला यावे, अशी इच्छा लता दीदींच्या मनी असावी. परलोकात लता दीदींना पाहण्यासाठी अगदी रांग लागलेली आहे. लता दीदींनाही अनेकांना भेटण्याची मनोमन इच्छा असणार. कारण इहलोकातून परलोकात गेल्यावर पुनर्भेटीचा लाभ लता दीदींना घ्यायचा असणार. अनेक गोष्टी सांगायच्या असतील, मन मोकळे करायचे असेल, गिले-शिकवे दूर करायचे असतील. मात्र, या सगळ्या भाऊगर्दीत लता दीदींची नजरही बाबा दीनानाथ आणि माई यांनाच शोधत असणार. कधी एकदा त्यांना भेटतेय, माईच्या कुशीत विसावतेय, बाबांना बिलगतेय अशी मनोवस्था लता दीदींची झालेली असणार. मात्र, पृथ्वीवर मिळवलेल्या प्रचंड नावलौकिकामुळे समोर असलेल्या दिग्गजांनाही डावलता येत नाही, हेही लता दीदींना ठाऊक असणार. कारण, ज्यांनी संधी दिली, प्रेम दिले, विश्वास दाखवला, जगावर गायकीचे साम्राज्य करण्याचे कंठात तसेच मनगटात बळ दिले, त्यांना सामोरे न जाणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त न केल्यासारखे वाटू शकेल. त्यामुळे समोर येत असलेल्यांना भेटून कधी एकदा आई-बाबांची भेट होतेय, असे लता दीदींना होत असावे.
बाबा, तुम्ही गेल्यानंतर सर्व जबाबदारी खांद्यावर आली. तीन बहिणी आणि एका भावाची काळजी घेताना काही उणीव तर राहिली नाही ना. एकेकाळी लक्ष्मी पाणी भरत असलेल्या दीनानाथांच्या घरात पुढे दोनवेळच्या अन्नाचीही भ्रांत पडावी, अशी भीषण स्थिती आली. आम्ही भावंडांनी एकमेकांची साथ कधीही सोडली नाही. अपार कष्ट सोसत, परिस्थिती झगडत आणि संघर्ष करत अखेर लोकप्रियतेच्या प्रचंड यशोशिखरावर पोहोचले. हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले बाबा. माझ्याने होईल, ते सर्व भावंडांसाठी माईसाठी केले. काही कमतरता राहिली असेल, तर माफ कराल ना बाबा. तुम्ही दिलेला साधुपुरुष (तंबोरा) प्राणपणाने जपून ठेवलेला आहे. तुमच्या शब्दाप्रमाणे त्यावर कधीही धूळ जमू दिली नाही. त्यानेही आपले वचन पाळत मला कल्पवृक्ष दिला. या साधुपुरुषाच्या केलेल्या तपर्श्चर्येमुळे विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशून चैतन्याची अनुभूती केवळ मी घेतली नाही, तर ती जगभरात जिथे जिथे संगीत आहे, तिथे तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न केला, अशा असंख्य भावना लता दीदींना दीनानाथांना, माईंना भेटताना मनात दाटून आल्या असाव्यात.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्या रचना, ओव्या यांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद लता दीदींमुळे श्रोत्यांना, रसिकांना मिळाला. नवरसातील प्रत्येक रसाचे गीत लता दीदी यांनी गायिले आहे. मानवी भावविश्वातील एकही भावना शिल्लक नसावी, जी लता दीदींच्या गाण्यातून किंवा गाण्याच्या एखाद्या ओळीतून आली नसेल. असा नवरसमिश्रित दहावा रस म्हणजे लता दीदी. नवरंगातील प्रत्येक रंग आपल्या कंठातून लिलया एक एक करून दाखवणारा दशमरंग म्हणजे लता दीदी. केवळ स्वर नाही, तर स्वरांमधील श्रुतीही दाखवून देणारा अलौकिक आवाज म्हणजे लता दीदी. कोणत्याही सप्तकात अगदी सहजपणाने संचार करून शकणाऱ्या आणि संगीतकाराने सांगितलेली कितीही कठीण जागा भावना ओतून गाणारा समर्थ कंठ म्हणजे लता दीदी. संगीताला पुन्हा एकदा शाश्वतेकडे नेणारा आश्वासक चेहरा म्हणजे लता दीदी. भारतासह जगभरात इतक्या जाती, धर्म, वंश, भाषा, प्रांत यांची वैविध्यता असताना भारताच्या एकात्मतेचे प्रतीक काय असा जर प्रश्न कोणी विचारला तर मी म्हणेन की भारतातल्या प्रत्येक जाती, धर्म, भाषा, वंश, प्रांत या सगळ्यांतला एक सामाईक धागा म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर!
सूर्याचे तेज शाश्वत आहे, चंद्राची शीतलता शाश्वत आहे, फुलातील सुगंध शाश्वत आहे, गंगेचे पावित्र्य शाश्वत आहे, आगदी त्याच प्रमाणे दीदींचा आवाज हा शाश्वतच आहे. जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य राहतील आणि पृथ्वीवर शेवटचा मानवी श्वास सुरू राहील, तोपर्यंत लता दीदींचा सूर हा पृथ्वीच्या वायू लहरींवर तरळत राहील. समुद्राच्या पाण्याची शाई करून अगदी प्रत्यक्ष सरस्वती देवीलाही आपलेच प्रतिबिंब मानल्या गेलेल्या लता दीदींचे वर्णन करायला पुढील पूर्ण युग बसवले, तरी शब्द, लेखणी आणि भावना थिट्या पडतील, अशा लता मंगेशकर परलोकाच्या प्रवासाला जगाला पोरके करून निघाल्या. ७ फेब्रुवारी २०२२ नंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला लता मंगेशकर नावाचे अजरामर व्यक्तिमत्त्व, नक्षत्रांचे देणे पृथ्वीलोकावर अधिराज्य गाजवत होते, असे सांगावे लागणार, यापेक्षा दुसरी हृद्य गोष्ट नाही.
- देवेश फडके