दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) मुलगा बाबिल (Babil) काही हिंदी सिनेमांमध्ये दिसला. त्याच्या एकंदर साध्या, सर्वांना आदर देणाऱ्या राहणीमानामुळे त्याने सर्वांचं मन जिंकलं. मात्र बाबिल सध्या नैराश्यात असल्याचा खुलासा त्याची आई सुतापा सिकदरने (Sutapa Sikdar) केला आहे. वडिलांशी सतत तुलना केली जात असल्याने त्याच्यावर दबाव आला आहे. इरफानच्या निधनानंतर आम्ही अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नसल्याचं त्या म्हणाल्या.
सुतापा सिकदर हिंदुस्तान टाइम्सशी बातचीत करताना म्हणाल्या, "बाबिल खूप जास्त दबावाखाली आहे. मला त्याची स्थिती पाहवत नाही. हे प्रेशर नसलं पाहिजे. इरफानवरही कधीच हे प्रेशर नव्हतं. जेव्हा तुमच्यावर कोणताही दबाव नसतो, तेव्हाच तुमची ओळख समोर येते. हे फक्त त्याच्या कामाविषयी नाही तर त्याने वडिलांना गमावलं आहे याविषयीही आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "तो आता जवळपास डिप्रेशनमध्येच गेला आहे. त्यातच हा स्ट्रेस आणि तुलना सतत असतंच..प्लीज माझ्या मुलाला सोडा. तो खूप कमजोर आहे आणि त्याच्यात लढण्याची भावना नाही. त्याचे बाबा खूप स्ट्राँग होते आणि मीही आहे पण जेनेटिकली हे त्याच्यात कुठून तरी आलं असेल."
अभिषेक बच्चनचं उदाहरण देत त्या म्हणाल्या, "आता जसं अभिषेक बच्चनने I WANT TO TALK मध्ये चांगलं काम केलं पण त्याचीही तुलना सतत अमिताभ बच्चन यांच्याशी होते. हीच गोष्ट त्याच्याविरोधात गेली. मला वाटतं बाबिलही याच तणावातून जात आहे. तो लवकर यातून बाहेर पडावा अशी मला आशा आहे."
बाबिल खानने २०२२ साली 'कला' सिनेमातून पदार्पण केलंय. नंतर तो 'फ्रायडे नाईट प्लॅन', 'द रेलवे मॅन' मध्येही दिसला.