पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येने देशाला धक्का बसला आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा प्लान गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि गोल्डी बराच यांनी केला होता. २९ मे रोजी सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्धूच्या हत्येमुळे पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. याआधीही अनेकदा तो चर्चेत आला होता. त्याची सर्वात जास्त चर्चा तेव्हा झाली होती जेव्हा त्याने सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिली होती.
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, हा तोच गॅंगस्टर आहे ज्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. २०१८ मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगातूनच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचं कारण होतं सलमान खानचं काळविट शिकार प्रकरण. कारण गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळेच त्याने सलमान खानला काळविट शिकार प्रकरणी आरोपी बनवलं तेव्हा लॉरेन्सही सलमानवर चिडला होता.
सलमान खानला जीवे मारण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीने प्लानिंग केलं होतं. 'रेडी' सिनेमाच्या शूटिंगवेळी लॉरेन्सने सलमान खानवर हल्ला करण्याचं प्लानिंग केलं होतं. पण त्यावेळी लॉरेन्स बिश्नोईला त्याच्या आवडीचं शस्त्र मिळालं नव्हतं. त्यामुळे हत्येचं प्लानिंग पूर्ण होऊ शकलं नव्हतं.
लॉरेन्स बिश्नोई दिल्लीच्या तिहार तुरूंगात कैदेत आहे आणि तो तिथूनच त्याची गॅंग ऑपरेट करतो. त्याच्या गॅंगमध्ये ७०० लोक आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्रुप सुपारी घेणे आणि हत्या करण्याची कामं करतात. त्यानंतर फेसबुकवरून गुन्ह्याची जबाबदारी घेतात. या गॅंगचं नेटवर्क देशभरात पसरलं आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि कॅनडाचा गोल्डी बराच सोबत काम करतात. असं सांगितलं जात आहे की, लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगात बसून कॅनडात असलेल्या गोल्डी बराचसोबत बोलून सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं प्लानिंग केलं.