गेल्या १८ वर्षांपासून महिला वर्गात विशेष लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे 'होम मिनिस्टर' (Home Minister). केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर तमाम देशभरातील महिलांचा या कार्यक्रमाद्वारे सन्मान करण्यात आला त्यामुळे आज हा प्रचंड लोकप्रिय शो असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या या प्रेमामुळेच सध्या महामिनिस्टर हे नवं पर्व (Maha Minister) महिलांच्या भेटीला आलं. या पर्वात देशातील अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्येच आता या महापर्वाला त्याची पहिली विजेती स्पर्धक मिळाली आहे. त्यामुळे ११ लाखांची पैठणी पटकावलेल्या या वहिनींची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
११ लाखांची पैठणी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं. यात अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात १ लाखाच्या पैठणीचा मान मिळवला. विशेष म्हणजे या १० जणींमध्ये रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी बाजी मारली आहे.
सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयीची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी अंतिम सामन्यातील खेळ पूर्ण करत ११ लाखांची पैठणी जिंकण्याचा मान पटकावला आहे.या १० जणींमध्ये येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात ११ लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे.
दरम्यान, आज रविवारी हा महाअंतिम सोहळा रंगणार असून लक्ष्मी ढेकणे यांच्या पदरात११ लाखांची सोन्याची जर आणि हिरे जडवलेली पैठणी पडणार आहे. तसंच हे महापर्व संपल्यानंतर उद्यापासून (२७ जून) होम मिनिस्टरचं 'खेळ सख्यांचा चारचौघींचा' हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात.