अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा आज डिजिटली रिलीज झाला. पण रिलीजआधीच या सिनेमावरून प्रचंड राडा झाला. चित्रपटाचे टायटल आणि कथेवरून लोकांनी या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी लावून धरली. अद्यापही हा वाद निवळलेला नाही. या वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारला ट्रोल केले जातेय. आता अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना ही सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.एका व्यक्तीले फोटोशॉप्डच्या मदतीने ट्विंकल खन्नाचा फोटो ‘लक्ष्मी’च्या पोस्टरवर फिट केला आणि त्याला ‘ट्विंकल बॉम्ब’ असे टायटल दिले. आता या फोटोवर लक्ष गेल्यावर ट्विंकल कुठे शांत राहणार होती. तिने हे मीम शेअर करत आपला संताप व्यक्त केला.
हा मॉर्फ्ड फोटो शेअर करत ट्विंकलने लिहिले, ‘एका ब्लॉगसाठी फोटो शोधत असताना माझी नजर या फोटोवर गेली. रिपोस्ट करण्यापेक्षा मी तो क्रॉप करुन शेअर करत आहे. तुम्ही देवाला थट्टेचा विषय बनवले, तू आमच्या देवावर विनोद केलास,तू एक थर्ड क्लास व्यक्ति आहेस, असे एका जणाने मला म्हटले. यावर मी त्याला उत्तर दिले की, देवाला खरोखर विनोद आवडत असतील. असे नसते तर त्याने तुला (ट्रोलर) का बनवले असते?’
ट्विंकल खन्नाने ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने बादशहा, मेला यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांची लेक असूनही तिला अभिनयक्षेत्रात फार यश कमावता आले नाही. ट्विंकल ही अभिनेत्री असली तरी तिने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आहे. ट्विंकलला अभिनेत्री म्हणून यश मिळवता आले नसले तरी तिने एक लेखिका म्हणून तिची आज एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्विंकलच्या मिसेस फनी बोन्स, द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद आणि पायजमाज आर फॉरगिव्हन या पुस्तकांना वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आता ती तिच्या चौथ्या पुस्तकाच्या लिखाणात व्यग्र आहे. ट्विंकल तिच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखली जाते.
काय आहे ‘लक्ष्मी’चा वाद
आधी अक्षयच्या या सिनेमाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ होते. या टायटलला प्रचंड विरोध झाल्यानंतर मेकर्सनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे टायटल बदलून ‘लक्ष्मी’ असे नवे टायटल दिले. पण या नव्या टायटलवरही नेटकरी समाधानी नाहीत. केवळ ‘बॉम्ब’ हटवले, मात्र ‘लक्ष्मी’ तसेच कायम ठेवले. सिनेमाच्या टायटलचा चित्रपटाच्या कथानकाशी काहीही संबंध नसताना हे नाव दिले गेले, हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे, असे नेटक-यांनी म्हटले आहे. आम्हाला ना ‘लक्ष्मी बॉम्ब’ नाव हवे, ना ‘लक्ष्मी’ अशी मागणी नेटक-यांनी केली आहे.
लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचाही आरोपकाही दिवसांपूर्वीच ज्वेलरी ब्रॅन्ड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून वादळ उठले होते. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार असल्याचा आरोप झाला होता. ‘लक्ष्मी’ या सिनेमावरही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला होता. अद्यापही लोक हाच आरोप करत आहेत. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव आसिफ आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. ‘लक्ष्मी’हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग याच्या हिंदी रिमेकमध्ये हे नाव आसिफ कसे झालेआणि हिरोईनच्या भूमिकेचे नाव प्रिया का ठेवलेगेलेअसा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.
‘लक्ष्मी’या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो यात आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसेल. अक्षयसोबतच या सिनेमात मुख्य भूमिकेत कियारा अडवाणी दिसणार आहे.