९०च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांनी मराठीबरोबरच बॉलिवूडही गाजवलं. लक्ष्मीकांत यांनी साकारलेल्या अनेक भूमिका अजरामर ठरल्या. प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या बनलेले लक्ष्मीकांत २००४ साली हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टी हादरली होती. तर त्यांच्या कुटुंबात पोकळी निर्माण झाली होती. लक्ष्मीकांत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी करिअर, कुटुंब, राजकारण आणि लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतरच्या काळाबद्दलही प्रिया बेर्डेंनी या मुलाखतीत भाष्य केलं. "एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझ्यावर घराची जबाबदारी खूप लवकर पडली. आम्हाला डिप्रेशन, टेन्शन हे असं शब्द माहितच नव्हते. जे समोर आलंय त्याच्यातून वाट काढून पुढे कसं जायचं? हा एवढाच विचार आम्ही करायचो. माझी आई, वडील आणि आजी गेली तेव्हा मी एकटी पडले होते. पण, जेव्हा लक्ष्मीकांत गेले तेव्हा सगळंच मायनसमध्ये होतं. अशावेळी हातपाय गळून चालणार नाही, हे मला माहीत होतं. आठ वर्ष काम बंद असल्यामुळे आता मी काय करू? पुढचं आयुष्य कसं घालवू? काम कशी मिळणार? असे प्रश्न माझ्यासमोर होते," असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंना कुटुंबीयांनी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिल्याचा खुलासाही त्यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केला. त्या म्हणाल्या, "मी अध्यात्मिक असल्यामुळे यातून लवकर सावरले गेले. त्यामुळे मी यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत गेले. नवरा गेला की आईवडील बरोबर असतात. घरातील माणसं बरोबर असतात. माझ्याबरोबर बेर्डे कुटुंबीय होते. पण, शेवटी त्यांना पण त्यांचं आयुष्य होतं. रविंद्र बेर्डे यांच्या पत्नी वैशाली वहिनी यांच्या मी खूप जवळ होते. तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की प्रिया बघ नाहीतर वर्षभरात दुसरा जोडीदार शोधायला हरकत नाही. तुझं वय लहान आहे. तू एकटी नाही राहू शकत. पण, तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की दुसरं लग्न वगैरे हा विचारच नाही. मी दुसऱ्याचा विचारच करू शकत नाही. माझ्या मुलांचं कसं होणार, हा विचार फक्त त्यावेळी माझ्या डोक्यात होता."
प्रिया बेर्डे यादेखील अभिनेत्री आहेत. त्यांना अभिनय आणि स्वानंदी ही मुलं आहेत. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयनेदेखील सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अभिनयने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे.