Join us

लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे लवकरच होणार सौ. माने, तारीख केली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 4:48 PM

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे बऱ्याचदा फोटोमुळे चर्चेत येते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. स्वानंदी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती लवकरच नाटकात पदार्पण करत असून तिच्या पहिल्या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. धनंजय माने इथंच राहतात.. असं या नाटकाचे नाव असून या नाटकात स्वानंदी सौ. मानेंच्या भूमिकेत ती दिसणार आहे. याबद्दल खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर सांगितले आहे.

स्वानंदी बेर्डे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिचे आगामी नाटक धनंजय माने इथंच राहतातच्या प्रयोगाच्या तारखा सांगितल्या आहेत. सर्वात आधी १९ मार्चला तिच्या या नाटकाचा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडणार आहे. 

यापूर्वी स्वानंदी बेर्डेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सांगितली होती. तिने फोटो शेअर करत लिहिले की, श्री आणि सौ. माने. माझ्या नवीन प्रोजेक्टबाबत तुमच्यासोबत शेअर करताना मी खूप उत्साही आहे. नवीन नाटक धनंजय माने इथेच राहतात.. लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय. वाट बघा. म्हणजे आमच्या येण्याची.

स्वानंदीचा भाऊ अभिनय बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. त्याने ती सध्या काय करते, रंपाट आणि अशी ही आशिकी या चित्रपटात काम केले. त्याने पदार्पण केल्यानंतर स्वानंदीच्या पदार्पणाची सगळेजण वाट पाहत होते. अखेर तीदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकात काम करताना दिसणार आहे.

खरेतर अशी ही बनवाबनवी चित्रपटातील धनंजय माने इथेच राहतात का हा लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचा हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. आता याच नावाचे नाटक येत्या मार्च महिन्यात नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. राजेश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकात स्वानंदीसोबत तिची आई आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :स्वानंदी बेर्डेअभिनय बेर्डेप्रिया बेर्डे