Join us

एखादं गाणं चालेल की नाही, हे तुम्हाला आधीच कळतं का? आशा भोसलेंनी दिलं खुमासदार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 21:52 IST

आशाताईंना आज भव्य कार्यक्रमात 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

Asha Bhosale, Maharashtra Bhushan Award: आपल्या सुमधूर स्वरांनी साऱ्यांना गेली सात दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना आज राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतरत्न दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळ्यात आशाताईंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते सुमीत राघवन यांच्याशी गप्पा मारताना, आशा भोसले यांनी गाण्यांबद्दलच्या एका प्रश्नाचं सुंदर उत्तर दिले.

"१९४३ साली तुम्ही मराठीतील पहिलं गाणं गायलात, १९४६ साली तुम्ही हिंदीतील पहिलं गाणं गायलात, तुम्ही एकूण १२ हजार गाणी गायलात ही खूपच मोठी गोष्ट आहे. एखादं गाणं गाताना किंवा आधी तुम्हाला अंदाज येतो का की हे गाणं खूप चालेल किंवा चालणार नाही...", असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या अभिनेते सुमीत राघवन यांनी विचारला. यावर आशाताईंनी अप्रतिम उत्तर दिले.

आशा भोसले यांचे खुमासदार उत्तर

"हा अंदाज देवाला सुद्धा आलेला नाही की मी जो माणूस जन्माला घालतोय त्याचं पुढे काय होणार आहे. तो कोण होणार? फिल्म इंडस्ट्रीतील लोक हल्ली ४०० कोटींची फिल्म बनवतात. सहा महिने स्टोरीवर काम करतात, सहा महिने स्क्रिप्टवर काम करतात, सहा महिने डायलॉग लिहिण्यातही घालवतात, त्यानंतर त्यांचा पिक्चर बनवता आणि सांगतात की माझा पिक्चर हिट होणार, पण खरं पाहता त्यातून त्यांना २०० कोटीही वसूल होत नाहीत. असं बरेच वेळा होता. त्यामुळे कोणतं गाणं चालणार हे आधीच सांगणं कठीण आहे. आम्हाला काही वेळा वाटतं एखादं गाणं खूप सुंदर आहे, पण पब्लिकला वेगळंच काहीतरी वाटतं. त्यांचा मूड वेगळा असतो.

आशाताईंची समृद्ध कारकीर्द

विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी  बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलंय. बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना 'मेलडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं.आशा ताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आशा भोसले, 1943 पासून या क्षेत्रात आहेत. ज्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.

विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत. भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.

टॅग्स :आशा भोसलेमुंबईबॉलिवूड