ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - रुपेरी पडद्यापासून दूर गेलेल्या उर्मिला मातोंडकरने अचानक एकदिवस येऊन आपल्या लग्नाची बातमी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भले उर्मिलाने कोणला काही थांगपत्ता लागू न देता गपचूप विवाह केला म्हणून काही जण नाराज असतील पण, तिच्या या निर्णयामुळे अनेकांना मनापासून आनंद झाला. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माचाही समावेश आहे.
उर्मिलाला बॉलिवूडमध्ये सेट करण्याचे आणि तिच्यातील अभिनेत्रीला शोधण्याचे श्रेय राम गोपाल वर्माला जाते. रामूने 'रंगीला'मधून उर्मिलामधील उत्तम अभिनेत्री जगासमोर आणली. त्यानंतर सत्या, भूत, मस्त या चित्रपटातून त्याने उर्मिलाकडून उत्तम अभिनय करुन घेतला.
मी आतापर्यंत काम केलेल्या अभिनेत्रींपैकी सर्वात सुंदर अभिनेत्रीची बातमी ऐकून खरोखर आनंद झाला. तिच आयुष्य कायम 'रंगीला' रहाव यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा असे टि्वट रामूने केलं आहे.
रंगीलानंतर आलेल्या रामूच्या चित्रपटांमध्ये उर्मिलाच नायिका होती. त्यामुळे त्यावेळी रामू आणि तिच्यात प्रेम प्रकरण सुरु असल्याची चर्चाही माध्यमांमध्ये रंगली होती. पण दोघांकडूनही या नात्याबद्दल कधीच काहीही भाष्य झाल नाही त्यामुळे ही फक्त चर्चाच राहिली. उर्मिला गुरुवारी काश्मिरी व्यावसायिक आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीर बरोबर विवाहबद्ध झाली.