ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21- अमेरिकेतील म्युझिक बॅण्ड ‘लिंकिंग पार्क’मुळे जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गायक चेस्टर बेनिंग्टनने आत्महत्या केली आहे. त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चेस्टरच्या वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या तणावामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज कॅलिफोर्निया पोलिसांनी वर्तवला आहे. चेस्टर बेनिंग्टन हा ४१ वर्षांचा होता. त्याच्या गायकीने त्याने करोडो चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. चेस्टरच्या आत्महत्येच्या वृत्ताने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे. त्याच्या म्युझिक बॅण्डमधील सहकलाकारांनी तसंच चाहत्यांनी ट्विटकरून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा
खुलासा! पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे केली जग्गा जासूसच्या अभिनेत्रीने आत्महत्या
शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अक्षयच्या नावे पैसे जमा करण्यासाठी फिरणारा "तो" मेसेज बनावट
चेस्टरचा जन्म फिनिक्समध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्याला संगिताची आवड होती. शाळेत असताना अनेक संगीत स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याने त्याच्या आवडीला प्रोत्साहन दिलं होतं. २००० साली वयाच्या २६ व्या वर्षी त्याने ‘लिंकिंग पार्क’ या म्युझिक बॅण्डची निर्मिती केली. ‘हायब्रीड थिअरी’ हा चेस्टरचा पहिला अल्बम असून त्या अल्बमला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला. तसंच त्याची गिटार वाजवण्याची शैली एकदम वेगळी असून ती शैली नेहमीच चर्चेत आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या या ग्रुपने तयार केलेल्या ‘हायब्रीड थिअरी’ या अल्बमच्या तब्बल 10 लाख सीडी विकल्या गेल्या होत्या. तसंच ‘मेटेओरा’ या अल्बमच्या सहा लाख सीडी विकल्या गेल्या होत्या.
‘हायब्रीड थिअरी’ या अल्बमनंतर एकापेक्षा एक धमाकेदार अल्बम चेस्टरने प्रेक्षकांच्या भेटीला आणले. ‘मेटेओरा’, ‘वन मोर लाईट’, ‘लिविंग थिंग्स’, ‘अ थाउझंट सन’ यांसारख्या संगीत अल्बमची त्याने निर्मिती केली. २००३ ते २०१० या काळात चेस्टर अमेरिकेतील सगळ्यात हीट गायक असल्याचंही सिद्ध झालं. पण यानंतर चेस्टर हा त्याच्या अल्बमबरोबर इतरही कारणांमुळे चर्चेत आला होता. दिवसभर तो अंमली पदार्थांचे सेवन करायचा आणि नशेतच असायचा, अशीही माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी त्याने एका मुलाखतीत आयुष्याचा कंटाळा आल्याचं म्हटलं होतं. आपण केलेल्या एक ना अनेक चुकांची जाणीव झाल्याचं सांगत आयुष्य संपवण्याचं विचार मनात येत असल्याचं त्यानं सांगितलं होतं.