बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतले आहे. या मजुरांना सुरक्षित घरी पोहोचवण्याचे काम सोनू करतोय. सोनूकडे मदतीचे हजारो मॅसेज येत आहेत. अशात काही भन्नाट मॅसेज चर्चेचा विषयही ठरले आहेत. एकाने सोनूकडे गर्लफ्रेन्डला भेटव, म्हणून मदत मागितली. तर एका बहाद्दराने चक्क दारूच्या दुकानापर्यंत पोहोचव, म्हणून सोनूला मॅसेज केला. आता ही चिमुकली बघा, तिने तर अशी काही मदत मागितली की, खुद्द सोनू सुद्धा हैराण झाला.सोनूने स्वत: या चिमुकलीचा व्हिडीओ शेअर केला आहे़ या व्हिडीओत एक गोड चिमुकली सोनूकडे मदत मागितले.
‘सोनू अंकल मी ऐकले की, तुम्ही सर्वांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करत आहात. माझे बाबा विचारत होते तुम्ही माझ्या आईला माझ्या आजीच्या घरी सोडू शकता का?’, असे ही चिमुकली या व्हिडीओत म्हणतेय. आता या चिमुकलीला बिच्चारा सोनू काय मदत देणार?सोनूने या चिमुकलीचा व्हिडीओ रिट्वीट करत त्यावर कमेंट केली. हे खरंच आव्हानात्मक आहे मात्र मी माझे प्रयत्न करेन, असे त्याने लिहिले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सोनूकडे गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मदत मागितली होती. तर आणखी एकाने दारुच्या दुकानापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली होती. यावर सोनूनेही भन्नाट उत्तरे दिली होती.
लॉकडाऊनमध्ये सोनू सूद लोकांसाठी दिवसरात्र खपतो आहे. त्याच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केवळ बॉलिवूड सेलेब्स आणि सामान्य लोकांनीच नाही तर अनेक राजकीय व्यक्तींनी सुद्धा केले आहे. नुकतेच राज्यपालांनी सुद्धा सोनूला भेटीला बोलवत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सोनू सूदने 1999 मध्ये साऊथ सिनेमातून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली होती. 2001 मध्ये त्याने शहिद ए आजम मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आतापर्यांत सोनूने अनेक सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र ख-्या आयुष्यात मात्र सध्या तो सर्वांचा हिरो ठरला आहे.