छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’(Sur Nava Dhyas Nava)ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे सहभागी झाला होता. त्याने आपल्या सुरेल स्वरांनी परीक्षकांसह श्रोत्यांची मनं जिंकली. मात्र नुकताच समीर या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्याबरोबर श्रृती जय ही देखील बाहेर पडली. त्यानंतर समीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.
समीर परांजपेने सूर नवा ध्यास नवा शोमधील फोटोंचा कोलाज शेअर करत लिहिले की, आयुष्यात एखादी प्रिय गोष्ट काही कारणांनी करायची राहून गेली की ती राहूनच जाते म्हणतात आणि फक्त दिवसेंदिवस आपल्यातलं आणि त्या गोष्टीतलं अंतर वाढत राहतं,आणि आपण असहाय्यपणे फक्त बघत राहतो हळहळत राहतो.. कट्ट्यावर वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे २-४ मित्रांच्या टोळक्यात आपल्या गुरूने दिलेल्या शिदोरीवर पोसलेल्या कलेची चमक दाखवून वाह वाह मिळवत राहतो आणि अरे लेका तू हे सीरियसली करायला हवं होतंस नाव काढलं असतंस हे ऐकून उगाचंच खूष होत राहतो.हे सगळं मी ही अनुभवलं आहे.पण अशीच एखादी राहून गेलेली गोष्ट फिरून परत आली तर? त्या वेळी राहून गेलं होतं काही कारणांनी म्हणतोस ना चल आता संधी आहे आता काय कारण देतोस बोल असे नियातीनेच पत्ते पिसले तर?? मी ही तेच केलं.. हावरटा सारखं गाणं जगून घेतलं.
''माझा वनवास संपवलात यासाठी कायम ऋणात राहीन...''
समीरने आणखी एक पोस्ट शेअर करत म्हटले की, सूर नवा चे आमचे लाडके परीक्षक अवधूत गुप्ते. काय बोलू मी दादा..नारायणा नंतरची मिठी कायम लक्षात राहील..तुमची शिट्टी आणि पार बुक्का पाडलास मित्रा हे ऐकलं की काय आनंद होतो सांगू..महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून आमचं मन तूम्ही जिंकले आहेच.. परीक्षक म्हणून ही तुम्ही आम्हा सगळ्यांचे लाडके आहात पण इथे शूटींग सुरू होण्याआधी ज्या आत्मीयतेने तूम्ही सगळ्या स्पर्धकांची चौकशी करायचात, तब्येत वैगरे ठीक आहे ना विचारायचात, बाहेरगावाहून आलेल्या आणि स्पर्धेसाठी इकडे मुंबईत राहत असलेल्या स्पर्धकांना राहता तिथे काही अडचण नाही ना, सगळं नीट वेळच्या वेळी मिळतंय ना काहीही अडचण असेल तरी डायरेक्ट मला सांगा म्हणायचात.. तेव्हा मला कळलं कुठल्याही गाण्यातला भाव तुम्ही इतक्या ताकदीने पेश कसं करू शकता.. तुमचं "माणूसपण" तुमच्या प्रत्येक गाण्यात उतरतं बहुदा परीक्षक म्हणून तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स मधून तर शिकलोच पण माणूस म्हणून ही खूप काही शिकवलंत..खूप प्रेम.. आणि माझा वनवास संपवलात या साठी कायम ऋणात राहीन.