मुंबई : हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनाची छाप पाडणाऱ्या रितेश देशमुखला 'लोकमत'च्या व्यासपीठावर महाराष्ट्राचा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रितेशने 2003 साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून सलग वर्षे रितेशने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळेच रितेशला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात रितेशला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रितेशने 2003 साली बॉलीवूडमध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमाद्वारे एंट्री केली होती. 2004 साली आलेल्या 'मस्ती' हा रितेशचा सिनेमा चांगलाच गाजला. रितेशला या सिनेमासाठी बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकनं मिळाली होती. या सिनेनामंतर रितेशने मागे वळून पाहिले नाही. रितेशने क्या कूल हैं हम, ब्लफमास्टर, मालामाल वीकली, हे बेबी, धमाल, हाऊसफुल, तेरे नाल लव्ह हो गया, हाऊसफुल-2, ग्रँड मस्ती, एक व्हिलन, हाऊसफुल-3 असे सुपर हिट सिनेमे दिले.
रितेश फक्त बॉलीवूडपर्यंत मर्यादीत राहिला नाही, तर आपली मातृभाषा असलेल्या मराठीमध्येही त्याने आपला ठसा उमटवला. मराठी सिने सृष्टीमध्ये रितेशने निर्माता म्हणून एंट्री केली. 2013 साली रितेश देशमुख निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित बालक पालक हा सिनेमा सुपर हिट ठरला होता. त्यानंतर रितेशने 'लय भारी' सिनेमात अभिनय केला आणि या सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.