अभिनेता सोनू सूदने आपल्या अभिनय कौशल्यासोबतच अनेकांना मदत करून लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. फार कमी लोकांना माहित असेल की मूळचा सोनू सूद पंजाबचा असला तरी त्याचे नागपूरशी फार जवळचे संबंध आहेत आणि नागपूरबद्दल बोलताना नेहमी तो भरभरून बोलतो. याचा प्रत्यय नुकताच लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड २०२० सोहळ्यात आला. या सोहळ्याला सोनू सूदने हजेरी लावली आहे.
यावेळी सोनू सूदने नागपूरशी त्याचे असलेल्या कनेक्शनबद्दल सांगितले. तो म्हणाला की, नागपूरशी माझे खूप जवळचे नाते आहे. माझ्या जीवनात नागपूरचे खूप मोठे योगदान आहे. मी पंजाबमधून नागपूरला आलो होतो. खूप काही मला नागपूरने दिले आहे. अभिनेता बनण्यासाठीची दिशा मला इथूनच मिळाली.
सोनू सूदची पत्नीदेखील नागपूरची आहे आणि तो नागपूरला त्याची कर्मभूमी मानतो. माझी पत्नीदेखील नागपूरमधील बेहरामजी टाउनमधील आहे. नागपूरमध्ये माझे खूप जवळचे मित्र आहे. आज मी जो काही आहे त्यात नागपूरचे खूप मोठे योगदान आहे. नागपूरमध्ये मला जे मिळाले ते कदाचित तितके मला पंजाबकडून मिळाले नाही. बऱ्याच लोकांना मी महाराष्ट्रीयन वाटतो. आजही मी नागपूरमधील गल्ल्यांमध्ये फिरलो मला माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि पुन्हा मी माझ्या कर्मभूमीत आल्याची मला जाणीव होते, असे सोनू सूद म्हणाला.
सोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. १९९९ साली 'कल्लाझागर' या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.