‘अरे ॠषीभाई सब मेरे एनर्जीकी बात करते है, मेरे फॅशन की बात होती है, अरे यार, कोई मेरी ॲक्टिंग की भी तो नोटीस कर ले,’ - असे म्हणत कोसळत्या पावसाच्या सरीसारखा बरसत व्यासपीठावर आलेल्या रणवीर सिंगने ‘८३’ या सिनेमासाठी ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या पुरस्काराचा अत्यानंदाने स्वीकार केला आणि पुरस्कार समारंभाची अख्खी संध्याकाळ त्याच्या हसत्या-गात्या-नाचत्या उपस्थितीने झळाळून निघाली !
या पुरस्कार समारंभाच्या दिवशीच ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ८०वा वाढदिवस होता. आपल्या या सदाबहार आयकॉनची आठवण काढत रणवीरने जाहीर केले, ‘मै अमिताभ बच्चन बनना चाहता था, अमिताभ बच्चन बनना चाहता हूं और अमिताभ बच्चन बनना चाहता रहूंगा!’वयाच्या ८०व्या वर्षीही अखंड कामात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांच्यासारखे होणे, हे आपले स्वप्न आहे, असे सांगून आपला पुरस्कारही रणवीरने बच्चन यांनाच अर्पण केला. ‘लोकमत’ समूहाचे संपादकीय संचालक ॠषी दर्डा यांनी रणवीर सिंगशी गप्पा मारल्या, तेव्हा काही वर्षांपूर्वीच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ समारंभात रणवीरने आमीर खानची मुलाखत घेतली होती त्याची आठवण निघाली आणि आधीच उत्साहात असलेल्या रणवीरची कळी खुलली!
डीजेवाले बाबू, मेरा गाना चला दो...रणवीर सिंगने महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार स्वीकारताच सूत्रसंचालकांनी ‘८३’ या सिनेमातल्या ‘त्या’ दृश्याची आठवण काढली आणि व्यासपीठाच्या मागून कुणीतरी एक लहरता तिरंगा आणून रणवीरच्या हाती ठेवला. तो लगेच म्हणाला, अरे यार, मेरावाला वो गाना बजा दो... मै नाचूंगा.. मै नाचना चाहता हूँ! रणवीरला हवे होते ‘८३’ मधले ते गाजलेले गाणे - जीतेगा जीतेगा इंडिया जीतेगा! रणवीर समोरच्या साउंड कन्सोलला सांगत होता, डीजेवाले बाबू, मेरा गाना चला दो! पण कुणीतरी म्हणाले, तो ट्रॅक नाहीये! थांबेल तो रणवीर कसला? तो म्हणाला, अब तो मै गाऊंगा भी और नाचूंगा भी! त्याने ते गाणे स्वत: गायले, प्रेक्षकांना गायला लावले आणि तिरंगा उंचावत व्यासपीठावर जल्लोष केला! मग कुणीतरी ‘बाजीराव मस्तानी’साठी मिळालेल्या पहिल्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराची आठवण काढली आणि मग सुरू झाले...बजने दे धडक धडक....
मुझे भूलना अच्छा लगता है !एक विलक्षण जुगलबंदी व्यासपीठावर रंगली ती नाना पाटेकर आणि रणवीर सिंग समोरासमोर आले तेव्हा! रणवीर पुरस्कार स्वीकारायला व्यासपीठावर आला तोच नाना पाटेकरांना घट्ट मिठी घालून, वर साष्टांग नमस्कार घालण्याच्या तयारीत! त्याने पाटेकरांना कमरेत लवून मुजरा केला आणि म्हणाला, क्या बताऊ, आप मेरे लिए क्या हो... आप तो ॲक्टिंग के शहेनशहा हो, टायटन हो, जनरेशनल चॅलेंज हो...’ तो सांगत होता, ‘नाना पाटेकर, मी नमस्कार घालतो तुम्हाला! तुमच्या ॲक्टिंगला! माझ्या पिढीतले कितीतरी नट, मी.. तुमच्या व्यक्तिरेखा पाहून-पाहून अभिनय शिकलो; पण तुमच्यासारखा अभिनय नाहीच कधी जमला. कारण जे तुम्ही करता, ते फक्त तुम्हीच करू शकता! क्रांतिवीर आठवतो का? क्रांतिवीर...?’- तोवर स्मित करत नाना पाटेकर पुढे आले... त्याला जवळ घेत पाटेकर शांतपणे चारच शब्द बोलले, ‘मुझे भूलना अच्छा लगता है !’