मुंबई - देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद Sonu Sood सतत कोरोनाने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करत आहे. लॉकडाऊन दरम्यान त्याने अनेकांना जेवण, पैसे दिले. लाखोंना त्यांच्या गावी पोहोचवलं तर अनेकांना वैद्यकीय मदतही केली. सोनू सूद कोरोना काळात प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरला. या कामातूनच प्रेरणा घेत लॉकडाऊननंतरही त्याने आपलं काम सुरूच ठेवलं आहे. आता, लंडनस्थित एका मॅगझीनने सोनूच्या कामाची दखल घेतली असून आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींमध्ये त्याचा पहिला नंबर लागला आहे.
लंडनमधील साप्ताहिक वर्तमानपत्र ईस्टन आयने प्रकाशित केलेल्या आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत सोनू सूदचा पहिला क्रमांक आहे. या स्थानावर विराजमान होण्यासाठी 47 वर्षीय सोनू सूदला अनेक दिग्गज सेलिब्रिटींशी स्पर्धा करावी लागली. आपल्या कामाच्या माध्यमातून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली, आणि लोकांना प्रेरित केलं, त्या सेलिब्रिटींचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. सोनू सूदनेही या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करताना आपल्या भावना बोलून दाखवल्या. आपल्या देशातील नागरिकांची मदत करणं हे माझं कर्तव्य असल्याचं मला लॉकडाऊन काळात लक्षात आलं.
ईस्टर्य आयचे संपादक असजद नजीर यांनी 50 सेलिब्रिटींची यादी तयार केली असून सोनू सूद या सन्मानाचे हक्काचे दावेदार आहेत, असे त्यांनी म्हटलंय. कारण, इतर कुठल्याही सेलिब्रिटींनी सोनू सूद एवढे काम लॉकडाऊन काळात केले नाही. त्यामुळे, सोनू सूदच्या कार्याला आमचा सलाम असल्याचेही नजीर यांनी म्हटलंय.
सोनूने घेतलं कर्ज
दरम्यान, ताज्या माहितीनुसार, सोनू आणखी काही चांगली कामे करणार आहे. अशी माहिती आहे की, तो त्याच्या ८ प्रॉपर्टीज गहाण ठेवून १० कोटी रूपयांचं लोन घेणार आहे. मनीकंट्रोल.कॉमच्या रिपोर्टनुसार, सोनूने त्याची दोन दुकाने आणि ६ फ्लॅट्स गहाण ठेवले आहेत. या प्रॉपर्टीजचा मालक सोनू आणि त्याची पत्नी सोनाली आहे. मात्र, सोनू सूदकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. तसेच याचा वापर तो कशासाठी करणार हेही समजू शकलेलं नाही.
मदतकार्य अद्यापही सुरूच
सोनू सूद सतत ट्विटरवर अॅक्टिव आहे आणि गरजू लोकांची मदत करत आहे. प्रवासी मजुरांना सुरू झालेला हा मदतीचा सिलसिला आता प्रत्येक गरजूसाठी फायदेशीर ठरतो आहे. त्याला मदतीसाठी रोज हजारो मेसेजेस येतात आणि यातील शक्य त्या लोकांना तो मदत करत असतो. इतकेच नाही तर त्याने एक हेल्पलाइन नंबरही जारी केला आहे. याआधी त्याने पंजाबच्या पॅरामेडिकल स्टाफला १५०० पीपीई किट आणि पोलिसांना २५ हजार फेस शील्ड्स दिले आहेत. अनेकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्याने अॅपही सुरू केलं आहे. तर ज्यांचा कोरोना काळात रोजगार गेला त्यांना आर्थिक मदतही करत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना त्याने जमेल ती मदत केली आहे आणि करतो आहे. सोबतच त्याने वेगवेगळ्या सिनेमांच्या शूटींगलाही सुरूवात केली आहे.