देओल कुटुंबातील दोन प्रसिद्ध कलाकार लोकसभा निवडणुकीत यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. मथुरातून हेमा मालिनी आणि गुरूदासपूरमधून सनी देओल लोकसभा निवडणुकीत उभे होते. अद्याप अधिकृतरित्या घोषणा झालेली नसली तरी हे दोघे जिंकणार असल्याचे चित्र दिसते आहे. सोशल मीडियावर हेमा मालिनी व सनी देओल यांचे समर्थक शुभेच्छा देत आहेत. तसेच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील ट्विटरवर पत्नी व मुलाचे अभिनंदन केले आहे.
धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा मालिनी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर करीत लिहिले की, हेमा, अभिनंदन... आमचे भारत मातेवर प्रेम आहे. हे आपण बिकानेर व मथुरामध्ये सिद्ध करून दाखवले आहे. आपण आपल्या भारताला नेहमी यशाच्या शिखरावर घेऊन जाणार.
तर त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मुलगा सनी देओलचे अभिनंदन करीत म्हटले की, फकीर बादशाह मोदी जी, भूमी पुत्र सनी देओल, अभिनंदन. अच्छे दिन आ गए.
धर्मेंद्र यांच्यासोबत ईशा देओलने देखील आई हेमा मालिनी आणि भाऊ सनी देओलच्या विजयाचे अभिनंदन केले आहे. ईशाने ट्विट केले की, अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, हेमा मालिनी व सनी देओल. यशाचे खूप कौतूक आहे. काय विजय मिळवलाय.
सनी देओलच्या निवडणुक प्रचाराला देओल कुटुंब एकत्रित आले होते. धर्मेंद्र व बॉबी देओल यांनी कित्येक दिवसांसाठी सनीसोबत गुरदासपुरमध्ये राहिले होते.
विजयाच्या वाटेवर असलेल्या सनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मला आनंद आहे की मोदींचा विजय होतो आहे. मला या गोष्टीचाही आनंद आहे की मीदेखील विजयी होतो आहे. आता फक्त माझे एकच उद्देश आहे की मला विजय मिळाला आहे तर त्या बदल्यात मी काम करू.सनीने पुढे म्हटले की, आपल्या क्षेत्राला आणखीन चांगले बनवू शकू. ही माझी जबाबदारी आहे. लोकांनी मला जे प्रेम दिले त्यासाठी मी खूप खूश आहे. इथे मी कोणत्या हेतूने आलेलो नव्हतो, फक्त काम करीत राहिन. विजयी होतोय, यासाठी खूश आहे.