Join us

आई सलग तिसऱ्यांदा खासदार! लेकीचा आनंद गगनात मावेना, हेमा मालिनींसाठी ईशा देओलची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 10:07 AM

ड्रीम गर्लने मथुरेत विजयाची हॅट्रीक केली. हेमा मालिनींच्या विजयानंतर ईशा देओलने खास पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

Loksabha Election Result 2024: मंगळवारी (४ जून) लोकसभा निवडणूकांचे निकाल लागले. संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलं होतं. देशात पुन्हा भाजपाची सत्ता येणार की सत्तापालट होणार? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. यंदाच्या निवडणुकीत बॉलिवूड सेलिब्रिटींनाही राजकीय पक्षाकडून तिकीट मिळालं होतं. विद्यमान खासदार असलेल्या हेमा मालिनी यांना उत्तर प्रदेशातील मथुरा येथून भाजपाचं तिकीट मिळालं होतं. या निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी हॅट्रीक केली आहे. 

हेमा मालिनी सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. दोन टर्म खासदार असलेल्या हेमा मालिनींना यंदाच्या निवडणुकीतही भरघोस मतं मिळाली. काँग्रेसच्या मुकेश धनगर यांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला. २०१४ आणि २०१९मध्ये हेमा मालिनी तब्बल ३ लाख मतांच्या फरकाने निवडूण आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत हेमा मालिनींना एकूण ५ लाख १० हजार ६४ मते मिळाली. २ लाख ९३ हजार ४०७ मताधिक्य राखत त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत केलं. 

ड्रीम गर्लने मथुरेत विजयाची हॅट्रीक केली. आई सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लेक ईशा देओलचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हेमा मालिनींच्या विजयानंतर ईशा देओलने खास पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. ईशा देओलने हेमा मालिनींचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. "अभिनंदन आई, हॅट्रिक", असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

लोकसभा निवडणूक निकाल २०२४ 

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत NDA ला जरी पूर्ण बहुमत मिळालं असलं तरी भाजपाचं स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं आहे. २४० जागांवर विजय मिळवल्याने भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर इंडिया आघाडीही सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याच्या तयारीत आहे. इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :हेमा मालिनीलोकसभा निवडणूक २०२४ निकालइशा देओलसेलिब्रिटी