Loksabha Election Result 2024 : नुकताच लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागांवर विजय मिळवता आला. अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने भाजपाचं स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न भंगलं. तब्बल १६ राज्यांत भाजपाला मिळालेल्या मतांमध्ये घट झाली. पण, भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला तो राम मंदिर बांधलेल्या अयोध्येतून. राम मंदिर बांधलेल्या फैझाबाद मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला. यानंतर सोशल मीडियावरही तुफान चर्चा रंगल्या होत्या.
भाजपाच्या अयोध्येतील पराभवानंतर शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. "भव्य मंदिराबरोबरच त्या परिसरातील नागरिकांचं जीवनही भव्य करण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे हे अयोध्येतील पराभवातून हे शिकलं पाहिजे. मंदिरासाठी उभारलेल्या कोटींच्या बजेटमधून तेथील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही कोटी राखीव ठेवले पाहिजेत. मग ते राम मंदिर असो चार धाम किंवा मग जयपूरमधील खाटू शाम मंदिर असो...देवस्थानांना टूरिस्ट स्पॉट बनवू नये. तिथल्या लोकांचीही काळजी घेतली पाहिजे", असं मुकेश खन्ना यांनी राम मंदिराचा फोटो शेअर करत म्हटलं आहे.
अयोध्येतील फैजाबाद मतदारसंघातून भाजपाच्या लल्लू सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती. २०१४ आणि २०१९ मध्ये लल्लू सिंह भाजपाच्या तिकिटावरच येथून खासदार झाले होते. यंदा ते हॅट्रिक करण्याच्या तयारीत होते. मात्र समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद यांनी ५४ हजार ५६७ मताधिक्य राखत त्यांचा पराभव केला. लल्लू सिंह यांना या निवडणुकीत ४ लाख ९९ हजार ७२२ मतं मिळाली. तर अवधेश प्रसाद यांनी ५ लाख ५४ हजार २८९ मतांसह विजय मिळवला.