लोकमान्य (Lokmanya) मालिकेत बळवंतराव टिळक देशभक्तीची धगधगती मशाल आपल्या देशबांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेणार आहेत. हा महत्त्वाचा टप्पा आपल्याला झी मराठी वाहिनीवर १९ मार्चला महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. लोकमान्य टिळकांनी जनमानसाच्या मनात आपल्या धारदार लेखणीने अढळ स्थान निर्माण केले. टिळकांचे अग्रलेख प्रचंड गाजले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचं योगदान महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत विशेष उल्लेखनीय आहे. हा महत्त्वाचा टप्पा लोकमान्य मालिकेत सध्या सुरू झालेला आहे.
मालिकेत आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिलं की तरूण पिढीला आपल्या मातीतलं अस्सल राष्ट्रीय शिक्षण देणारी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा बळवंतरावांनी सुरू केली. या राष्ट्रकार्यामध्ये त्यांना आगरकर, चिपळूणकर यांनी मोलाची साथ दिली. शिक्षणाने तरूणांमध्ये जागरूकता निर्माण होईल, समाजभान येईल असा विश्वास बळवंतरावांना वाटतो. तसेच यापुढे आपल्या देशकार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी, अधिकाधिक लोकापर्यंत राष्ट्रभक्तीचे विचार पोहोचवण्यासाठी टिळकांना वृत्तपत्र सुरू करण्याचा पर्याय योग्य वाटतो. टिळक हा आपला विचार आगरकर आणि चिपळूणकर यांना सांगतात आणि तिघेही मिळून वृत्तपत्र सुरू करण्याच्या कामात स्वतःला झोकून देतात.
टिळकांना केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू करताना कोणत्या संकटांचा सामना करावा लागला, त्यावर त्यांनी कशी मात केली, हे आपल्याला १९ मार्चला महाएपिसोडमध्ये दुपारी १ आणि रात्री ८ वाजता पहायला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.