LMOTY 2019: 'न्यूड'ची नायिका कल्याणी मुळ्ये ठरली 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 06:55 PM2019-02-20T18:55:58+5:302019-02-20T19:08:59+5:30
मराठी सिनेसृष्टीतील धाडसी प्रयोग म्हणून ओळखल्या गेलेल्या 'न्यूड' या चित्रपटात न्यूड मॉडेलचं काम करणारी अभिनेत्री कल्याणी मुळ्ये हिला यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील धाडसी प्रयोग म्हणून ओळखल्या गेलेल्या 'न्यूड' या चित्रपटात न्यूड मॉडेलचं काम करणारी अभिनेत्री कल्याणी मुळ्ये हिला यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून एका कॉलेजमध्ये न्यूड मॉडेलचं काम करणाऱ्या आईची हेलावून टाकणारी कहाणी न्यूड या सिनेमातून दाखवण्यात आली होती. त्यातील अभिनेत्री कल्याणी मुळ्येच्या अभिनयाचं देशातच नव्हे, तर जगभर कौतुक झालं. पैशांची गरज असल्याने या व्यवसायात ओढली गेलेली आणि नंतर याच व्यवसायावर प्रेम करायला लागलेली महिला, या सगळ्या छटा कल्याणीनं ताकदीनं साकारल्या. या सिनेमात कल्याणीने साकारलेली यमुना निव्वळ अप्रतिम आहे. परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसमोर का होईना, पण देहावरची वस्त्रं उतरवायला लागणे यातली अगतिकता तिनं जशी साकारली, त्याला तोड नाही.
कल्याणी मुळ्ये मुळात नाट्यकलाकार. एका नाटकाचे इंग्रजीत आलेले परीक्षण वाचून दिग्दर्शक रवी जाधवने न्यूड चित्रपटासाठी तिची निवड केली. नाशिकमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत हिरे यांच्यासोबत नाटकांमध्ये काम सुरू असतानाच कल्याणीला एनएसडीला (राष्ट्रीय नाट्य विद्यालय) जाण्याची संधी मिळाली होती. दिल्लीला गेल्यानंतर कठोर मेहनत घेऊन कल्याणीने स्वत:ला सिद्ध केले. अनेक हिंदी मराठी नाटकातून काम, मालिका तसेच अनेक जाहिरातींमधूनही ती झळकली आहे. 'न्यूड' चित्रपटात तिने 'यमुना' या मॉडेलची भूमिका साकारली आहे. त्यासाठी 'न्यूड' मॉडेल्सशी प्रत्यक्ष संवाद, कार्यशाळा याची तिला मदत झाली. आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी ती एका कॉलेजमध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम करत असते.
हे होतं परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.