मुंबई : आपल्या बहुरंगी, बहुढंगी अभिनयाने नाट्यरसिकांना खळखळून हसवणारे आणि हळूच काहीतरी शिकवून जाणारे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकातील 'मन्या'च्या भूमिकेसाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रशांत दामले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'एका लग्नाची गोष्ट' हे नाटक सुपरहिट ठरलं होतं. मन्या आणि मनीचं प्रेम, त्यांचं लग्न, मग संसार, समज-गैरसमज, त्यामुळे येणारा दुरावा आणि गोड शेवट रसिकांना भावला होता. प्रशांत दामलेंचा झक्कास अभिनय आणि कविता लाड-मेढेकर यांची तितकीच सहजसुंदर साथ यामुळे हे नाटक आजही रसिकांना हळूच हसवतं. त्याचाच पुढचा भाग म्हणजे 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर पती-पत्नीचं नातं कशा पद्धतीने बदलत जातं, हे हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडण्यात आलं आहे. सहकाऱ्याच्या सांगण्यावरून ऑफिसातल्या एका मुलीच्या प्रेमात पडणारा आणि त्यामुळे घरच्या बायकोला सांभाळण्याची त्रेधा तिरपीट करणारा मन्या प्रशांत दामले यांनी रंगवला आहे. 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं', हे त्यांनी गायलेलं गाणंही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्याबद्दलच 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
हे होतं परीक्षक मंडळ
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.