मुंबईः 'मोरया मोरया'चा जयघोष आणि 'माऊली माऊली'चा गजर करत मराठी संगीत परंपरेची ध्वजा अगदी सातासमुद्रापार फडकवणारी अजय-अतुल जोडी म्हणजे महाराष्ट्राची शान. त्यांच्या संगीताची स्टाइल काही औरच. याच 'लय भारी' स्टाइलचा सन्मान आज 'लोकमत'ने केला. मोस्ट स्टायलिश म्युझिक डायरेक्टर म्हणून अजय-अतुल यांना गौरवण्यात आलं.
गोड गळ्याचा गायक म्हणून मनामनात स्थान मिळवलेला सोनू निगम 'लोकमत'च्या पुरस्कार सोहळ्यात मोस्ट स्टायलिश सिंगर ठरला.
पुण्याच्या ढोल पथकातील धडाडीचे शिलेदार ते परदेशातील स्टुडिओमध्ये संगीत दिग्दर्शन करणारे संगीतकार, हा अजय-अतुल जोडीचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. अगं बाई अरेच्चा, सावरखेड एक गाव, जोगवा, नटरंग, जत्रा, सैराट, लय भारी या मराठी सिनेमांना संगीतसाज चढवणाऱ्या अजय-अतुल यांनी अग्निपथ, सिंघम, बोल बच्चन, ठग्स ऑफ हिंदुस्थान या बड्या बॉलिवूडपटांमधूनही आपल्या संगीताची जादू दाखवली आहे. किंग खान शाहरुखच्या 'झीरो' या बहुचर्चित सिनेमाची गाणी सध्या कल्ला करताहेत. तीही अजय-अतुलनेच संगीतबद्ध केली आहेत. यशाची शिखरं सर करत जाणाऱ्या अजय-अतुलच्या पाठीवर 'लोकमत'ने कौतुकाची थाप दिली आहे.
सोनू निगमची गाणी गेली अनेक वर्षं संगीतप्रेमींना 'याड' लावत आहेत. अखियो से गोली मारे हे उडत्या चालीचं गाणं असो किंवा तनहाईसारखं थेट हृदयाला भिडणारं आर्त गीत; सोनूने ते तितक्याच ताकदीनं सादर केलं. त्याच्या अल्बममधील गाण्यांनी तरुणाईला भुरळ पाडली. त्याचा गळा जितका गोड आहे, तितकाच तो दिसायलाही गोड आहे. स्वाभाविकच तरुणी त्याच्यावर फिदा होतात. त्यामुळे तरुणांसाठी तो 'स्टाइल आयकॉन'ही ठरलाय.