मुंबई: दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये अल्पावधीत स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री भूमी पेडणेकरला लोकमत मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. मराठमोळ्या भूमीनं आतापर्यंत मोजक्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मात्र यामधून तिनं ठसा उमटवला. याशिवाय दैनंदिन आयुष्यात ती कायम स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. यामुळेच लोकमतनं मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार पुरस्कारानं तिचा गौरव करण्यात आला. मुंबईत होत असलेल्या दिमाखदार सोहळ्यात तिला सन्मानित करण्यात आलं. भूमीनं तीन वर्षांपूर्वी दम लगा के हैश्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर अक्षय कुमारसोबतच्या टॉयलेट एक प्रेम कथा, शुभ मंगल सावधान यासारख्या सिनेमांमधून तिनं वेगळ्या धाटणीच्या भूमिका अगदी लिलया साकारल्या. सध्या सगळीकडे वेब सीरिजची मोठी चर्चा आहे. तरुणाई सध्या मोठ्या प्रमाणात वेब सीरिज पाहते. या नव्या क्षेत्रातही भूमीनं आपल्या अभिनयाचं नाणं अगदी खणखणीत वाजवून दाखवलं. लस्ट स्टोरीजमधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी तोंडभरुन कौतुक केलं. त्यामुळेच लोकमतनं यंदाची मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार म्हणून भूमीची निवड केली आहे.
Lokmat Most Stylish Award 2018: भूमी पेडणेकर ठरली मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 23:27 IST