मुंबई - पोषक आहारतज्ञ्ज म्हणून सर्वदूर ख्याती परसलेल्या ऋजुता दिवेकर यांना Lokmat Most Stylish Award 2018 : पब्लिक हेल्थ अॅडव्होकेट पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. 'फिटनेस'च्या जमान्यात ऋजुता दिवेकर यांचे हेल्थ फंडे कॉलेज स्टुडंटपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण दैनंदिन आयुष्यात अंमलात आणत आहेत. 25 एप्रिल 2008 रोजी बॉक्सऑफिसवर झळकलेल्या 'टशन' सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या 'झिरो' फिगरनं केवळ पुरुषांनाच नाही तर स्त्रियांनाही पुरतं घायाळ केले होतं. करीना कपूरला मॅजिक फिगर साइज झिरोसाठी मंत्रा देणाऱ्या दुसऱ्यातिसऱ्या कोणी नाही तर मऱ्हाठमोळ्या ऋजुता दिवेकर यांनीच तिचं सौंदर्य आणखी खुलवण्यात मदत केली होती.
करीना कपूरला सडपातळ, सुडौल दिसण्यासाठी डाएटचे धडे देणाऱ्या ऋजुता दिवेकर तेव्हापासून प्रसिद्धीच्या झोतात आल्या. करीनाची झिरो फिगर पाहून तिच्या महिला चाहत्यांनी अनुकरण करण्यास सुरुवात केली. प्रत्येकजण ऋजुता यांनी दिलेले फिटनेस डाएट फॉलो करू लागले. करिना कपूरसारख्या अभिनेत्रींपासून ते कॉर्पोरेट जगतातील मोठमोठ्या दिग्गजांपर्यंत अनेकांना सल्ला देणाऱ्या दिवेकर यांनी हेल्थ मंत्रा देणारी विक्रमी खपाची तीन पुस्तकेही लिहिली आहेत. ऋजुता यांनी पाश्चात्याचं अनुकरण न करता भारतीय परंपरेतून चालत आलेली आणि प्रत्येक व्यक्तीचा वेगळेपणा जपणारी अशी खाण्याची पद्धत विकसित केली.
कॉलेजमध्ये असतानाच ऋजुता यांनी 'अॅरोबिक्स' आणि 'एस.एन.डी.टी'मधून स्पोर्टस-सायन्स अॅण्ड न्यूट्रिशियनचा कोर्स केला. या क्षेत्रातच आवड असल्याचं ओळखल्यानंतर त्यांनी आहारशास्त्रामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देत आपला अभ्यास पूर्ण केला. खाऊ नकापेक्षा सर्व काही खा, असे सांगत ऋजुता आज अनेकांना निरोगी आयुष्यासाठी आरोग्याची गुरुकिल्ली गवसेल या दिशेनं हेल्थ फंडे देत आहेत.