वेब सीरीजमधील बोल्डनेस आणि तेवढ्याच भडक डायलॉगबाजीवर नेहमीच वादग्रस्त चर्चा होत असते. तरी सुद्धा वेबसीरीजची लोकप्रियता वाढत आहे आणि मोठ-मोठे बॉलिवूड कलाकारही वेब सीरीजमध्ये बघायला मिळत आहेत. अशातच अभिनेत्री दीपिका पादुकोणने सुद्धा वेब सीरीजमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून यातील बोल्डनेसबाबतही दीपिका पादुकोणने तिचं मत अगदी स्पष्टपणे मांडलंय.
'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्यात लोकमत समूहाचे जॉईंट एमडी आणि एडिटोरिअल डायरेक्टर ऋषी दर्डा यांनी दीपिकाची मुलाखत घेतली. त्यावेळी तिनं आपली फॅशन, करिअर, रणवीरसोबतचा संसार या विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
दीपिकाला वेबसीरीजमधील बोल्डनेसबाबत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, 'मला त्यात काही गैर वाटत नाही. मुळात एखाद्या सीनमधील बोल्डनेसचा संदर्भ काय आहे हे बघणं जास्त महत्वाचं आहे. एखादा बोल्ड सीन बघताना फारच भडक वाटू शकतो. पण त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. जेव्हा तुम्ही एक क्रिएटिव्ह व्यक्ती असता तेव्हा तुमच्यासमोर काय येतं त्यासाठी तुम्ही पूर्ण विचार करून बघितलं पाहिजे. त्यानुसारच निर्णय घेतला पाहिजे. मला वाटतं माझ्या आयुष्यात घेतलेले सगळे निर्णय हे सहजभावनेतून घेतलेले आहे. मी माझ्या अंतःप्रेरणेला फॉलो करते'.
यावेळी बोलताना फॅशन आणि स्टाईलबाबत ती म्हणाली की, 'फॅशनमुळे तुम्हाला स्वत:ला व्यक्त करण्यास मदत मिळते. जेव्हा तुम्ही काही घालता तेव्हा तुम्हाला तुमच्यात आत्मविश्वास दिसतो. माझ्यामते तेच फॅशन आहे'.
करिअरच्या प्रवासाबाबत ती म्हणाली की, 'सिनेमात येण्याआधी मला काहीच माहीत नव्हतं. ना लाईट्स, ना कॅमेरा काही नाही. माझ्यावर भाषेच्या टोनमुळे टिकाही झाली. पण मी शिकत गेले. मी सतत आव्हानं स्वीकारत गेली आणि आताही काम करत आहे'.