मुंबई - सारा अली खान(Sara Ali Khan) म्हणजे बॉलिवूडची हरहुन्नरी स्टार. कानामागून आली अन् तिखट झाली, असंच तिच्याबद्दल म्हणायला लागेल. अगदी कमी वेळात सारा बॉलिवूडची स्टार बनली. केदारनाथ या पहिल्यावहिल्या चित्रपटात तिनं असा काही पॉवरफुल परफॉर्मन्स दिला की, बघणारे थक्क झालेत. हिच सारा आज लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड सोहळ्यात मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन पुरस्कारानं गौरवण्यात आली. हसरी, चुलबुली सारा अवार्ड घेण्यासाठी स्टेजवर आली, तेव्हा साऱ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला.
सारा अली खान बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी वजन १०० किलो होतं. वजन कमी करणं हे सारासाठी मोठं आव्हान होतं. तिनं प्रचंड मेहनत घेतली़ पिझ्झा जाम आवडायचा अगदी तो जीव की प्राण होता. पण वजन कमी करण्यासाठी सारानं पिझ्झाचा त्याग केला. मेहनत रंग लाई आणि सारा अगदी फिट होऊन बॉलिवूडमध्ये दाखल झाली. बघणारे बघत राहिले आणि सारा कमाल दाखवत राहिली.
केदारनाथ या चित्रपटातील तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. यानंतर सिम्बा, कूली नंबर 1 या चित्रपटात सारा झळकली. लवकरच तिचा ‘अतरंगी रे’ हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत झळकणार आहे.