नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप लावून खळबळ माजवणारी आणि बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेला खऱ्या अर्थाने वाचा फोडणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता आज शुक्रवारी पुण्यात आयोजित ‘लोकमत विमेन समिट २०१८’च्या व्यासपीठावर पुन्हा एकदा बोलली.तनुश्रीने पुन्हा एकदा १० वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या त्या किस्स्याचा कटू अनुभव शेअर केला. तो दिवस माझ्या आयुष्यातील शॉकिंग दिवस होता, असे तनुश्री यावेळी म्हणाली. त्या दिवशी असे काही घडेल, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी बोलण्याची हिंमत दाखवल्यावर सगळे माझ्यावर उलटसुलट आरोप केले जात आहे. मी फक्त एवढेच म्हणेल की, ज्याच्यावर बितते त्यालाचं कळते. मी पण एक माणूस आहे, मलाही भावना आहेत, हे लोकांनी समजून घ्यावे, असे तनुश्री म्हणाली.बॉलिवूडमध्ये ज्यावेळी ती घटना घडली, त्यावेळी मला ३०-४० चित्रपट आॅफर झाले. पण माझ्या बाजूने समाजापुढे उभे राहण्याची हिंमत कुणीही दाखवली नाही. या एका गोष्टीने मी माझ्यातील आत्मविश्वास गमावला. मी इंडस्ट्रीपासून तुटून वागू लागले. आज मला लोकांचा पाठींबा मिळतोय. मीटू मोहिम सुरु झाली आहे. लैंगिक अत्याचार सहन करणे याचा तुमच्या अख्ख्या मानसिकस्थितीवर परिणाम होतो. हे सगळे सहन करणे सोपे नसते. बलात्कार झालेल्या महिलेची मानसिक स्थिती काय असते, हा अंदाजही आपण लावू शकत नाही. ती काय भोगते, हे केवळ तीच जाणते, असे तनुश्री म्हणाली.
#LokmatWomenSummit2018 : ‘त्या’ दिवशी असे काही घडेल, मी स्वप्नातही विचार केला नव्हता- तनुश्री दत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 5:22 PM