भारतीय सिनेमाच नाही तर जगभरातल्या सिनेप्रेमींवर आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारी सौंदर्यवती.तिचे डोळे जितके बोलके तितकीच जादू तिच्या अभिनयातही.ब्युटी विथ ब्रेन एंड टॅलेंट असा जिचा उल्लेख केला जातो. ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन.
ऐश्वर्यालाही अभिनयाच्या क्षेत्रात कडू गोड अनुभव आलेत. बॉलीवुडमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यासाठी तिला गरज होती ती एका हिटची. तिच कसर भरुन काढली ती संजय लीला भन्सालीच्या सिनेमांनी.तिच्या अभिनयाची खरी झलक दिसली तिनं साकारलेल्या नंदिनीमध्ये.
'हम दिल दे चुके सनम'मध्ये नंदिनी आणि समीरचा ऑन स्क्रीन रोमान्स सुरु असताना ऑफ स्क्रीनही दोन हृदय एकमेंकामध्ये गुंतले होते.ते म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय.दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा त्या काळी रंगल्या होत्या. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही.मात्र 2001 साली दोघांच्या प्रेमकहाणीत मोठं वादळ आलं.
सलमान खाननं मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं ऐश्वर्याचं कथित विधान एका इंग्रजी दैनिकानं छापलं.त्यानंतर दोघांच्याही नात्यात कायमचा दुरावा आला. त्याच दरम्यान 'क्यों हो गया ना'च्या सेटवर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉयमध्ये जवळीक वाढत असल्याच्याही वावड्या उठल्या. त्यामुळंच विवेक आणि सलमानमध्ये कोल्ड वॉरच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या.
सलमान असो किंवा विवेक कुणीही ऐश्वर्याच्या मनाचा राजा होऊ शकलं नाही. कुणी कल्पनेतही विचार केला नसेल की या घराची ऐश्वर्या सून बनेल.
मात्र रेशीमगाठीत स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात ते काही चुकीचं नाही.एकीकडे ऐशनं सलमानशी नातं तोंडलं.विवेकशी प्रेमाच्या चर्चा सुरु होत्या. त्याचवेळी 'ढाई अक्षर प्रेम के' म्हणत तिनं ज्युनियर बी अभिषेक बच्चनला क्लीनबोल्ड केलं.'कुछ ना कहो' आणि 'धूम-2'च्या सेटवर तर लव्हस्टोरी सुरु होती.
ऐश्वर्या राय आणि अभिषेकसाठी 2007 हे वर्ष थोडं खास होतं.कारण जानेवारी महिन्यात दोघांची प्रमुख भूमिका असलेला 'गुरु' रुपेरी पडद्यावर झळकला. रिलीजनंतर अवघ्या दोन दिवसांनी दोघांची एन्गेजमेंटही झाली.'गुरु'च्या सुपरडुपर यशानंतर ऐश-अभि 20 एप्रिल 2007 रोजी रेशीमगाठीत अडकले.
उत्तर भारतीय आणि बंगाली पद्धतीने दोघांचं शुभमंगल पार पडलं आणि ऐश्वर्या राय बनली ऐश्वर्या राय बच्चन.चित्रपटसृष्टीची सुपर हिरोईन ठरलेली ऐश आता पूर्णपणे आपल्या संसारात आणि आराध्यामध्ये दंग झालीय.त्यामुळं तिला सुपर मॉम हे नावंही पडलं.