Join us

प्रेमाची संगीत खुर्ची

By admin | Published: October 29, 2016 3:49 AM

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आज शुक्रवारी रीलीज झाला. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या चित्रपटातील

- जान्हवी सामंतकरण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आज शुक्रवारी रीलीज झाला. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या चित्रपटातील सहभागामुळे हा चित्रपट वादात सापडला. पण हा गुंता करणने अगदी अलगद सोडवला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. खरे तर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला प्रेमाची संगीत खुर्ची म्हटले तर वावगे ठरणार नाही. आयन (रणबीर कपूर) हा आलिझा (अनुष्का शर्मा)वर जिवापाड प्रेम करतो. पण आलिझाला त्याच्यात केवळ एक मित्रच दिसतो. आयनला हवे असते प्रेम आणि आलिझाला हवी असते मैत्री. या दोघांच्या नात्याचा लपंडाव सुरू असताना आयन सबाला (ऐश्वर्या राय बच्चन) ला भेटतो. सबावर अद्यापही तिचा पूर्वाश्रमीचा पती ताहिर तितकेच जिवापाड प्रेम करत असतो. पण उर्दू शायरींच्या जगात रमणाऱ्या सबाच्या आयुष्यात नात्याला मुळीच स्थान नसते. अर्थात तरीही ती आयनच्या प्रेमात पडते. पण आयनला अजूनही आलिझाचेच प्रेम खुणावत असते. खरे तर कथा फार गुंतागुंतीची नाहीच. पण चित्रपट पाहताना चित्रपटाची कथा यापूर्वी कुठे तरी पाहिल्याचा भास होतो आणि क्षणात रणबीरच्या ‘रॉक स्टार’ची आठवण येते.आयन एका श्रीमंत घरातला मुलगा असतो. पण वडिलांचा पारंपरिक व्यवसाय सांभाळण्याऐवजी त्याला गाण्यात अधिक रस असतो. तुझ्या आवाजात काहीही ‘दर्द’ नाही, असे आलिझा त्याला अगदी परखडपणे सुनावते. खरा प्रेमभंग झाल्याशिवाय तुझ्या आवाजात दर्द येणार नाही, हेही सांगते. कारण प्रेमभंगाचे दु:ख आलिझाने सोसलेले असते. यानंतर आयन-आलिझा फिरतात, मनसोक्त पार्ट्या करतात. अशाच एका पार्टीत आलिझाला तिचा पूर्व प्रियकर अली (फवाद खान) पुन्हा भेटतो आणि त्याच्यासोबत ती निघून जाते. अली आलिझावर प्रेम करतो, हे समजायला आयनला वेळ लागत नाही. तो तिच्या लग्नालाही पोहोचतो आणि गातो. या गाण्यात ‘दर्द’ असतो. आलिझाला तो बरोबर जाणवतो. पण आलिझा आयनला केवळ एक मित्र मानत असते. आलिझाच्या लग्नावरून परतानाच आयनला सबा भेटते. यानंतर आयनच्या प्रेमाचे काय होते? आलिझा तिच्या नवऱ्यासोबत आनंदी राहते वा नाही? चित्रपटाची कथा ‘रॉकस्टार’सारखी आहे वा नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुम्हाला हा चित्रपटच बघावा लागेल.चित्रपटाबद्दल सांगायचे तर करणच्या प्रत्येक चित्रपटात दिसणारा मेलोड्रामा, रोमान्स आणि सुपरहिट साँग्स या चित्रपटातही आहेत. अगदी सुंदर ग्लॅमरस लाइफस्टाईल, इजी कम इजी गो सेक्स, पार्टी, ड्रिंक्स, फॉरेन ट्रिप्स, अफेअर, ब्रेकअप झाल्यानंतरही अगदी घनिष्ठ मैत्री ठेवणारे एक्स बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, नोकरी-धंदा असले काहीही पाश नसलेले, प्रेमावर तत्त्वज्ञान झाडणारे प्रेमवीर असे (अनेकदा मनाला न पटणारे) सगळे सगळे करणच्या चित्रपटात असतेच असते. वास्तवापासून खूप दूर असणाऱ्या या सर्व गोष्टी या चित्रपटातही अगदी तशाच आहेत. पण तरीही मेळ जमून न आल्याने विस्कटीतपणा जाणवतो. प्रेमभंगावरचे सततचे संवाद कंटाळवाणे वाटायला लागतात.चित्रपटाची सुरुवात चांगली होती. रणबीर आणि अनुष्काचे संवाद काही वेळ भारी वाटतात. पण नंतर त्यांचे एकमेकांप्रतिचे आकर्षण, मैत्री यावर अगदी कंटाळा येईपर्यंत चर्चा होते. चित्रपटाचा पहिला भाग अनुष्काच्या हास्यविनोदामुळे खिळवून ठेवतो. पण दुसऱ्या भागात कथेतील गुंतागुंत वाढत जाते. पुढे पुढे मनाला पटणार नाहीत, अशी काही वळणे येतात. ते पाहून चित्रपट कधी संपतो नि कधी नाही, असे वाटायला लागते.खरे तर करणचे सगळे चित्रपट वास्तवापासून दूर जाणारे असतात. त्यात काहीही नवीन नाही. पण ‘ऐ दिल है मुश्किल’ वास्तवापासून अतीच दूर वाटतो. इतका की, त्यातील व्यक्तिरेखेशी प्रेक्षक कुठल्याही स्तरावर जोडला जाऊ शकत नाही. अभिनयाचे म्हणाल तर चित्रपटाचा पूर्ण भार रणबीरच्या खांद्यावर दिसतो. आयनच्या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यात रणबीरने कुठलीही कसर सोडलेली नाहीय, हे पदोपदी जाणवते. अनुष्काही तिच्या भूमिकेत फिट बसते.