आपला अभिनय आणि कुणालाही घायाळ करेल असं चेह-यावरील स्मित हास्य यामुळे मराठीसह हिंदी रसिकांवर जादू करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. 'हम आपके हैं कौन' या सिनेमातील तिनं साकारलेली भूमिका रसिकांना प्रचंड भावली. या सिनेमातील तिचं हास्य, अभिनय याची रसिकांवर जादू झाली होती. 'सुरभी' या छोट्या पडद्यावरील शोमधूनही तिने रसिकांची मने जिंकली होती.
रेणुकाच्या फिल्मी करिअरप्रमाणे लव्हस्टोरी देखील सिनेमाला साजेल अशीच भन्नाट आहे. रेणुकाने आशुतोष राणोसबत लग्न करत संसार थाटला. मुळात रेणुकाची आशुतोष यांची पहिली भेटअभिनेत्री राजेश्वरी सचदेवमुळे झाली होती. पहिल्या भेटीतच आशुतोष राणा यांना रेणुका फार आवडली होती. रेणुकासह मैत्री करण्यासाठी त्यांनी अनेक युक्त्याही लढवल्या, त्याकाळात मोबाईल फोनचाही इतका वापर नव्हता. रेणुकाला संपर्क करायचा असेल तर घरी असलेल्या लँडलाईन फोनवरच संपर्क करावा लागायचा.
यातही फोनवर आलेले सगळे कॉल रेकॉर्ड व्हायचे. रेकॉर्ड झालेले कॉल रेणुकाला महत्त्वाचे वाटले तरच ती कॉलबॅक करायची. एकदा रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आशुतोष यांनी त्यांच्या घरी फोन केला. रेकॉर्डींग ऐकल्यानंतर रेणुकाने कॉलबॅक केला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. रेणुकालाही आशुतोष आवडायला लागल्याने हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढायला लागल्या आणि अखेर कुटुंबियांच्या संमतीने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्न ठरल्यानंतर रेणुकाच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 25 मे 2001 मध्ये लग्नबंधनात अडकले.
आशुतोष आणि रेणुका यांना दोन मुलं आहेत. शौर्यमन आणि सत्येंद्र ही त्यांच्या दोन्ही मुलांची नावे आहेत. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष देण्यासाठी रेणुकाने अभिनयापासून काही काळाचा ब्रेक घेतला. मुलांच्या जन्मानंतर पाच वर्षानी म्हणजे 2008 मध्ये रेणुकाने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. रिटा या सिनेमाचे यशस्वी दिग्दर्शन तिने केले.