मराठी चित्रपट ‘मुंबई पुणे मुंबई-२ लग्नाला यायचंच’ या चित्रपटाची पहिली झलक दाखल झाली आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटात अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मध्यवर्ती भूमिकेत दिसून येतील. स्वप्निल म्हणाला, ‘‘प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडत असते, असे म्हटले जाते. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून प्रत्येकालाच या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अनेक कारणांमुळे म्हणजे, कधी अभिनेत्यांच्या तारखा न मिळाल्याने, तर निर्मात्यांच्या कधी आगाऊ ठरवलेल्या कामांमुळे चित्रपट प्रदर्शित करण्यास उशीर झाला. परंतु, मला वाटते की, वेळ आली नव्हती आणि आता ही वेळ प्रदर्शनाकरिता योग्य आहे. मुक्ता म्हणाली, आपण प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या क्षणी कुणाच्या तरी प्रेमात पडतो... सुरुवातीला आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रेम सुंदर भासू लागते. कोणी ठरवून प्रेमात नाही पडत, ते सहज घडते, आपल्याला विरघळून जायला होते. अगदी प्रेमाचा विचार केला, तरीही आपल्या चेहऱ्यावर हसू उमटते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा माझ्याकरिता एक असाच महत्त्वाचा, न संपणारा, सुंदर आणि मोलाचा अनुभव होता. जेव्हा मला सतीशने पटकथा ऐकवली तत्क्षणी मी ‘मुंबई पुणे मुंबई’च्या प्रेमात पडले. मुंबई पुणे मुंबई-२ लग्नाला यायचंच म्हणजे सतीश, स्वप्निल, सुहास आणि इतरांसोबतचा एक अविस्मरणीय असा प्रवास आहे. यामध्ये माझी आणि स्वप्निलची फॅमिलीपण आहे. एखादे दृश्य, गाणं किंवा छोट्या प्रसंगाची झलक दिसल्यावर माझं काळीज थबकून जातं... अगदी पहिल्यांदा प्रेमात पडल्याप्रमाणेच!सतीश म्हणाला, पहिला मुंबई पुणे मुंबई केवळ दोन पात्रांभोवती चित्रित करण्यात आला होता. चित्रपटभर ते दोघे कल्पना, मते, अवकाश आणि इतर मुद्दे कसे वेगळे आहेत याबद्दल चर्चा करतात. दोन परस्पर विरुद्ध व्यक्ती एकत्र भेटतात आणि शेवटी प्रेमात पडतात. मुंबई-पुणे-मुंबई हळुवार सुरू होतो आणि शेवटी ती एक वेगळी लव्ह स्टोरी होते. प्रेमातली पुढची पायरी म्हणजे लग्न. या चित्रपटाच्या निर्मितीकरिता मीरा एन्टरटेन्मेंट आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट एकत्र आले असून, उमेश शिंदे आणि भरत चतुर्वेदी हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. मिराह एन्टरटेन्मेंट प्रा.लि. (एम.ई.पी.एल.)चे अमित भानुशाली म्हणाले, ‘‘आम्ही निर्माण केलेला हा पहिला मराठी सिनेमा आहे. प्रत्येक जण आधीच्या सिनेमाप्रमाणे या सिनेमावर आणि प्रतीक्षेत असलेल्या विवाह मोसमावर प्रेमाचा वर्षाव करेल.’’ एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया म्हणाले, माझ्या पहिल्या सिनेमापासून एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि मिराह एन्टरटेन्मेंटने एकत्रित अनेक मराठी सिनेमे केले आहेत. हे संबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने आम्ही एकत्रित येऊन पहिल्यांदा ‘मुंबई-पुणे-मुंबई-२’ची निर्मिती केलेली आहे.
प्रेमात पाडणारं लग्न
By admin | Published: September 25, 2015 3:25 AM