Join us

बॉलिवूड स्टार्सचे लक फॅक्टर

By admin | Published: August 10, 2015 2:17 AM

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही. परंतु काही मंडळी मेहनतीसोबतच लक फॅक्टरही महत्त्वाचा मानतात. विशेष म्हणजे, असे मानणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचे स्टार्सही आहेत

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही. परंतु काही मंडळी मेहनतीसोबतच लक फॅक्टरही महत्त्वाचा मानतात. विशेष म्हणजे, असे मानणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचे स्टार्सही आहेत. यात जसा हातातल्या ब्रेसलेटला आपले लक फॅक्टर मानणारा सलमान खान आहे तशीच लिंबू-मिरची घराच्या दारात टांगल्याने येणारी संकटे परत फिरतात असे मानणारी बिपाशा बसूही आहे. अशाच काही स्टार्सच्या लक फॅक्टरची ही अनोखी कहाणी...अमिताभ बच्चन : अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या सर्वांना महिती आहे. बच्चन यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून ही उभारलेली कंपनी तोट्यात गेली अन् अमिताभ आर्थिक अडचणीत सापडले. मात्र ते उजव्या हातातल्या मधल्या बोटात जी निळ्या रंगाची सफायर खड्याची अंगठी घालतात तिच्यामुळे त्यांना या धक्क्यातून सावरता आले, असे ते मानतात. ‘कौन बनेगा करोडपती’ला उदंड प्रतिसाद मिळाला अन् अमिताभ यांची रुळावरून घसलेली गाडी पुन्हा: वेगाने धावायला लागली. हे या निळ्या अंगठीमुळेच घडले असा त्यांचा विश्वास आहे. बिपाशा बसू : लिंबू-मिरचीने आपल्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव होत नाही, असे बॉलिवूडची हॉट बेब बिपाशा बसूचे म्हणणे आहे. लिंबू-मिरची दारावर लावण्याची परंपरा माझ्या आईने आमच्या घरात सुरू केली आहे. माझ्या कारमध्येदेखील मी रोज लिंबू-मिरची लावत असते. राज- 3 या चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगीही मी मुंबईच्या अनेक आॅटोरिक्षांवर लिंबू-मिरची टांगली होती, असे बिपाशा सांगते.शाहरूख खान : रेड चिली एंटरटेनमेंटचा मालक व बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान हा ट्रिप्पल फाइव्ह (५५५) क्रमांक आपला लकी क्रमांक समजतो. ज्या वेळी त्याने पहिल्यांदा आपल्या कारचा क्रमांक ५५५ ठेवला तेव्हापासून त्याची अपार प्रगती झाली, असा त्याचा विश्वास आहे. त्याच्या जवळ असलेल्या रोल्स राय, बीएमडब्ल्यू, पजेरो, बॅन्टले या कारचा क्रमांकदेखील ५५५ आहे; तर ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्येदेखील त्याला ५५५ क्रमांकाची बाईक चालवताना प्रेक्षकांनी पाहिले आहे.सलमान खान : सलमान खानच्या हातातले लक्ष वेधून घेणारे सफायर ब्रेसलेट हे त्याचे जीव की प्राण आहे. तो हे ब्रेसलेट फार लकी असल्याचे मानतो. त्याचे वडील सलीम खान यांनी ते ब्रेसलेट त्याला गिफ्ट केले होते. तेव्हापासून सल्लूने ते काढलेले नाही. अगदी चित्रपटांमध्येही त्याच्या हातात ते कायमच असते. त्याचे फॅनही याला फॅशन समजून फॉलो करीत असतात. हिट अ‍ॅण्ड रन केसच्या अंतिम सुनावणीच्या वेळीदेखील सलमान कारमध्ये बसण्याआधी आपल्या हातात हेच ब्रेसलेट घालताना दिसून आला होता. विद्या बालन : विद्या बालन ही गुणी अभिनेत्री जास्त मेकअप करीत नाही. मात्र काजळ तिचे फेव्हरेट आहे. बरं... या काजळचे नाव काय माहीत आहे का? हाशमी. विद्या नेहमी काजळ लावते ते फक्त हाशमी काजळ. हाशमी काजळ हे पाकिस्तानमध्ये पॉप्युलर आहे. शिवाय लाल साडीदेखील विद्याची ओळख बनली आहे. ‘डर्टी’ पिक्चरमध्ये लाल रंगाच्या साडीने पुन्हा डार्क कलर्सची फॅशन बॉलिवूडमध्ये आली. आता लाल साडीदेखील ती आपल्यासाठी लकी मानते.दीपिका पदुकोण : बॉलिवूडची शंभर करोड क्वीन दीपिका पदुकोण ही मुंबईच्या सिद्धिविनायकला फार लकी मानते. सिनेमा रिलीज होण्याआधी व रिलीज झाल्यानंतर ती दरवेळी सिद्धिविनायक मंदिरात न चुकता बाप्पांचे दर्शन घेते. ये जवानी है दिवानी, चेन्नई एक्स्प्रेस, गलियो की रासलीला - राम लीला या सर्व सिनेमांच्या वेळी दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात माथा टेकला होता.