ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - बॉलिवूड दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा सध्या शौचालयांच्या कमतरतेवर आधारित चित्रपट तयार करत आहेत. पण त्यांनी आपला हा विचार फक्त चित्रपटापुरता मर्यादित ठेवला नसून ज्या झोपडपट्ट्यांमध्ये ते शूट करत आहेत तिथे शौचालयही बांधून देत आहेत.
राकेश ओमप्रकाश मेहरा आपला आगामी चित्रपट "मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर" साठी घाटकोपरच्या झोपडपट्टीत शूटिंग करत आहेत. मुंबई महापालिकेने त्यांना 20 शौचालय बांधण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये दहा पुरुषांसाठी तर उर्वरित दहा महिलांसाठी शौचालय बांधले जातील. तसंच शूटिंग सुरु आहे त्याठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयाचं नव्याने बांधकामही करण्यात येत आहे. या शौचालयामुळे किमान एक हजार कुटुंबांना फायदा होणार आहे.
"रंग दे बसंती" आणि "भाग मिल्खा भाग" सारखे चित्रपट दिग्दर्शित करणा-या राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी युवा अनस्टॉपेबल नावाच्या एका एनजीओसोबत हातमिळवणी केली आहे. गेल्या चार वर्षांपासून शौचालय बांधून ते गरिबांची मदत करत आहेत. यासंबंधी त्यांच्याशी बातचीत केली असता समुद्रातील थेंबाएवढीदेखील ही मदत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
"आम्ही फक्त शौचालय बांधून आमचं काम संपवत नाही. तर लोक त्याची योग्यरित्या वापर करतील याची खात्रीही करुन घेतो. झोपट्टीवासी आणि स्थानिक नगरसेवकांची भेट घेऊन आम्ही एक रुपया डोनेशन घेतो जेणेकरुन कामगारांना त्यांचा मोबदला देता यावा. नवीन शौचालय खासगी इमारतींप्रमाणे साफ आणि स्वच्छ आहेत. यामध्ये व्यवस्थित पाईपलाईन आणि नळ लावण्यात आले आहेत. येथे पिण्यासाठी शुद्द पाणीही मिळेल", अशी माहिती राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिली आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आतापर्यंत 800 हून अधिक शौचालये बांधली आहेत. "झोपडपट्टीत राहणा-यांकडे टीव्ही, मोबाईल आहे पण शौचालय नाही. पावसाळ्यात तर त्यांना रेल्वे रुळावर जावं लागंत. एका वृत्तपत्रात रेल्वेने रुळावर बसलेल्या महिलेला उडवल्याची बातमी वाचली होती. एका शौचालयासाठी आपला जीव देणं कितपत योग्य आहे", असं राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी विचारलं आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा सध्या पवई तलावाजवळील झोपडपट्ट्यांमध्ये शूटिंग करत आहेत. याठिकाणी 30 ते 45 मिनिटांसाठी पाणी येतं. याठिकाणीदेखील शौचालय बांधण्याचा निर्धार राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी व्यक्त केल आहे.