सौंदर्याचे दुसरे नाव म्हणजे, मधुबाला. या मधुबालाने एकेकाळी आपल्या अभिजात सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले. तिच्या अभिनयानेही सिनेप्रेमींना भुरळ पाडली. सौंदर्याची खाण असलेल्या याच मधुबालाची आज ८६ वी जयंती. आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे साजरा होतोय. मात्र गुगलने आजचा दिवस हा मधुबालाच्या नावे केला आहे. त्यानिमित्ताने गुगलने आपले आजचे डूडल मधुबालाला समर्पित केले आहे. गुगलच्या डूडलवर मधुबालाचे एक सुंदर स्केच लावण्यात आले आहे. हे स्केचही मधुबाला यांच्या सौंदर्याप्रमाणे अप्रतिम आहे.
१४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीत मधुबालाचा जन्म झाला. तिचे खरे नाव, मुमताज जहां बेगम असे होते. ११ बहिणींत मधुबालाचा पाचवा क्रमांक होता. मधुबालाचे वडिल अताउल्लाह पेशावर येथील तबांखूच्या कारखान्यात काम करायचे. त्यानंतर ते दिल्लीला आले आणि तेथून मुंबईला.
सौंदर्याच्या बाबतीत मधुबालाची तुलना मर्लिन मन्रोशी केली जाते. मधुबाला एक अशी अभिनेत्री होती, जिने केवळ बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडलाही वेड लावले होते. कदाचित तिच्या सौंदर्यावर भाळूनचं आॅस्कर अवार्ड विनर दिग्दर्शक फ्रँक कापरा हे तिला हॉलिवूडमध्ये बे्रक देऊ इच्छित होते. पण मधुबालाला हॉलिवूडमध्ये जराही रस नव्हता.
मधुबालाने वयाच्या नवव्या वर्षी चित्रपटात काम केले. १९४२ साली आलेल्या ‘बसंत’ या चित्रपटात मधुबालाने बालकलाकाराची भूमिका केली होती. १९४७ मध्ये ‘नीलकमल’ या सिनेमात ती अभिनेत्री म्हणून झळकली. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने ६६ चित्रपटांत काम केले. पण तिची एक इच्छा मात्र शेवटपर्यंत अधुरी राहिली. होय, मधुबालाला ‘रोटी, कपडा और मकान’चे दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘बिराज बहू’ या चित्रपटात काम करायचे होते. यासाठी तिने बिमल रॉय यांच्या आॅफिसचे उंबरठे झिजवले. पण काही कारणास्तव बिमल रॉय मधुबालाला या चित्रपटात कास्ट करू शकले नाहीत. तिच्या जागी यात कामिनी कौशलची वर्णी लागली. मधुबालाला आयुष्यभर ‘बिराज बहू’ हातचा गमावल्याची याची खंत होती. हा चित्रपट १९५४ मध्ये प्रदर्शित झाला होता. शरदचंद्र चटोपाध्याय लिखीत ‘बिराज बहू’ याच नावाच्या बंगाली कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता.
मधुबालाला एक नव्हे अनेक आजार होते. तिच्या हृदयाला छिद्र होते. पण तिच्या फुफ्फुसांतही समस्या होती. याशिवाय एक दुर्मिळ आजारही तिला होता. त्यामुळे तिच्या शरिरात आवश्यकतेपेक्षा अधिक मात्रेत रक्त तयार व्हायचे. मग हे रक्त नाक व तोंडावाटे वाहत असते. अतिरिक्त मात्रेतील रक्त बाहेर पडेपर्यंत हा रक्तस्त्राव सुरु असायचा. यामुळे मधुबाला विव्हळत असायची. वेदनांनी बेजार व्हायची. तिची स्थिती इतकी खराब होती की, डॉक्टर रोज घरी येऊन तिच्या शरिरातून अनेक बाटल्या रक्त काढायचे. शेवटच्या काळात प्रत्येक चार तासांत तिला आॅक्सिजन द्यावा लागायला. या आजारांनी तब्बल नऊ वर्षे मधुबालानी विव्हळत काढली. उपचारासाठी तिला इंग्लंडलाही नेण्यात आल्ें. पण मधुबालाची स्थिती पाहता डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास नकार दिला. त्यामुळे मधुबालाला हे कळून चुकले होते की, ती जास्त दिवस जगणार नाही. अखेर २३ फेब्रुवारी रोजी मधुबालाने शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी मधुबालाचं वय केवळ ३६ वर्षे होते.