Join us

"आम्हाला देवळात लग्न करायचं होतं, पण...", मधुरा वेलणकरने सांगितली लग्नाची हटके गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:52 IST

मधुरा वेलणकर आणि अभिजीत साटम यांनी 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती.

मधुरा वेलणकर आणि अभिजीत साटम ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. सिनेसृष्टीतील मोजक्या आणि लाडक्या जोडींपैकी एक म्हणजे मधुरा-अभिजीतची जोडी. आदर्श कपल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या जोडीने नुकतंच 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत मधुरा आणि अभिजीतने त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से सांगत लग्नाचीही गोष्ट सांगितली. 

मधुरा आणि अभिजीतला थाटामाटात लग्न करायचं नव्हतं. त्यांना मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत लग्नाच्या बेडीत अडकायचं होतं. पण, वेलणकर आणि साटम या दोन्ही कुटुंबीयांना मुलांची लग्न धुमधडाक्यात पार पाडायची होती. त्यामुळे त्यांनी शाही लग्नाचा घाट घातला होता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मधुराने याचा खुलासा केला. ती म्हणाली, "आम्हा दोघांनाही कमी माणसांमध्ये देवळात लग्न करायचं होतं. पण, आमच्या घरातील मी तिसरी म्हणजे शेवटची मुलगी आणि याच्या घरातील पहिलं लग्न त्यामुळे आमच्या आईवडिलांना ते मान्य नव्हतं." 

"शेवटी देवळात करायचं लग्न आम्ही ६०० माणसांमध्ये केलं. आम्हाला ५० लोकांमध्ये लग्न करायचं होतं. आईवडिलांना ज्यांना बोलवायचं आहे त्यांना बोलवू दे असं म्हणत नंतर आम्ही सोडूनच दिलं. माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात तर १७०० माणसं होती. त्यामुळे ६०० म्हणजे खूपच कमी माणसं झाली. तेही दोघांकडची मिळून ६०० माणसे होती. माझ्या बहिणीच्या लग्नात नंतर माणसांना जागा नव्हती. त्यामुळे आम्हाला काही लोकांना तुमचं झालं असेल तर निघा अशी रिक्वेस्ट करावी लागली होती," असंही मधुराने सांगितलं.  

टॅग्स :मधुरा वेलणकरमराठी अभिनेतासेलिब्रिटी