मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) ने मुंबईच्या वरळी परिसरात तब्बल ४८ कोटी रुपयांचा लग्झरी घर खरेदी केले आहे. ५३ व्या मजल्यावर असलेल्या या घरातून अरबी समुद्र आणि महालक्ष्मी रेसकोर्सचा नजारा पाहायला मिळतो. माधुरीने वरळीतील डॉ. ई मोजेस रोडवरील सुपर प्रीमियम रेसिडेंशियल प्रोजेक्ट इंडियाबुल्स ब्लू याठिकाणी हे शानदार घर खरेदी केले आहे.
जवळपास ९० हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने माधुरी दीक्षितनं हे घर खरेदी केले आहे. यावर्षीची ही सर्वात मोठी डील आहे. माधुरीचं घर टॉवरमधील ५३ व्या मजल्यावर आहे. घराचा कार्पेट एरिया ५ हजार ३८४ स्क्वेअर फूट आहे. इंडियाबुल्स ब्ल्यूमध्ये अनेक उद्योगपतींनी घर खरेदी केले आहे. १० एकरमध्ये पसरलेला हा प्रोजेक्ट तब्बल १०० कोटींमध्ये व्यवहार झाला आहे. माधुरीने या घराचं रजिस्ट्रेशन २८ सप्टेंबरला केले. त्यावर २.८ कोटी रुपये स्टँम्प ड्युटी भरावी लागली.
महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार, महिलांना घर नोंदणीवर १ टक्के सूट दिली जाते. माधुरीला या घरासोबत ७ पार्किंग स्लॉट देण्यात आले आहेत. माधुरीने मागील वर्षी याच प्रोजेक्टमध्ये २९ व्या मजल्यावर ५५०० स्क्वेअर फूट घर भाड्याने घेतले होते. जवळपास ३६ महिन्याचा भाडे करार होता. दीक्षित नेने कुटुंबाने या घरात इंटिरिअर कामाला सुरुवात केली होती. आता हे भाड्याचे घर कायम ठेवणार की भाडेकरार रद्द होणार याबाबत अस्पष्टता आहे.
मागील महिन्यात फार्मास्यूटिकल कंपनीचे चेअरमन आणि एमडी अमित बख्शी यांनी वरळीत Three Sixty West प्रोजेक्टमध्ये ६१ कोटींना घर खरेदी केले होते. ३० व्या मजल्यावर असलेल्या या घरासाठी प्रति स्क्वेअर फूट ९४५०० दर लावण्यात आला होता. सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मुंबईत स्टँम्पड्युटीवर सूट दिली होती. मात्र ३१ मार्च २०२१ रोजी ही सूट होती. या काळात शहरात घरांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आले.
'The Kashmir Files'च्या दिग्दर्शकानंही मुंबईत खरेदी केलं घर'द काश्मीर फाईल्स' या सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि पत्नी पल्लवी जोशी यांनीही अलीकडेच मुंबईत एक शानदार घर खरेदी केले आहे. अंधेरी परिसरात एक अपार्टमेंटमध्ये घर खरेदी करण्यात आलां आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. Ectasy Reality मध्ये अग्निहोत्री दाम्पत्याने घर खरेदी केले आहे. इकोनॉमिक्स टाईम्स रिपोर्टनुसार, विवेक अग्निहोत्री यांनी १७.९२ कोटीमध्ये घर खरेदी केलं आहे. कार पार्किंगसह या घराचा कार्पेट एरिया ३२५८ स्क्वेअर फूट आहे. या घरासाठी जवळपास १.०७ कोटी रुपये स्टँम्प ड्युटी भरण्यात आली आहे. या घराची किंमत ५५ हजार रुपये प्रती स्क्वेअर फूट असल्याचं बोललं जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"