येत्या दिवाळीच्या मुहुर्तावर बॉक्सऑफिसवर धमाका होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी दोन बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एक म्हणजे रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' आणि दुसरा 'भूल भुलैय्या 3'. दोन्ही सिनेमांमधील स्टारकास्टही खूप तगडी आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याने एकंदरच बॉक्सऑफिसवर मोठा क्लॅश पाहायला मिळणार आहे. 'भूल भुलैय्या 3' मध्ये माधुरी दीक्षितही (Madhuri Dixit) मुख्य भूमिकेत आहे. तिने या क्लॅशवर प्रतिक्रिया दिली आहे.
पिंकव्हिलाशी बातचीत करताना माधुरी दीक्षित म्हणाली, "मला वाटतं याआधीही नीट आठवत नाही पण दिल आणि बेटा एकाच दिवशी रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमात मोठी स्टारकास्ट होती. मात्र दोन्ही सिनेमांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. हे प्रेक्षकांवरच अवलंबून असतं, त्यांनीच ठरवायचं असतं की कोणता सिनेमा त्यांना जास्त आवडला किंवा ते आधी कोणता सिनेमा पाहायला जातील. त्यामुळे अंतिम परीक्षा थिएटरमध्येच होईल. मी एवढंच म्हणू शकते की आम्ही चांगलं प्रोडक्ट बनवलं आहे, नक्की या आणि आमचा सिनेमा बघा."
ती पुढे म्हणाली, "कोणता सिनेमा जास्त चांगला असेल हे सांगणं कठीण आहे. पण मला माहितीये की आम्ही चांगलं प्रोडक्ट बनवलं आहे. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. मनोरंजक सिनेमा बनवायचा प्रयत्न केला आहे आणि मला आशा आहे की लोकांना सिनेमा नक्की आवडेल."
भूल भुलैय्या ३ मध्ये माधुरीही मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय ओरिजनल मंजुलिका विद्या बालन आणि माधुरी दीक्षितमध्ये जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. तर कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.