Join us

श्रीदेवीनं नाकारलेल्या सिनेमात माधुरी दीक्षितची लागली वर्णी, या सिनेमातून 'धकधक गर्ल' बनली स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:44 AM

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही नव्वदच्या दशकातील बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. पण माधुरी दीक्षितच्या स्टार बनण्यात श्रीदेवी(Shridevi)चा मोठा रोल होता हे फार कमी लोकांना माहीत असेल.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही नव्वदच्या दशकातील बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. पण माधुरी दीक्षितच्या स्टार बनण्यात श्रीदेवी(Shridevi)चा मोठा रोल होता हे फार कमी लोकांना माहीत असेल. तिने सुमारे ३ दशकांपूर्वी एक ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारला होता, त्यानंतर माधुरी दीक्षितचे नशीब उजळले. सुमारे ३२ वर्षांपूर्वी, एक कौटुंबिक ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून निर्मात्यांची भरभराट केली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या यशामुळे माधुरी दीक्षितही स्टार झाली. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे 'बेटा'.

'बेटा' हा फॅमिली-ड्रामा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला होता. त्यात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. तर अरुणा इराणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. वास्तविक, या चित्रपटात तिची नकारात्मक भूमिका होती, ज्यासाठी कोणतीही अभिनेत्री ती करायला तयार नव्हती. 'बेटा' हा तामिळ हिट चित्रपट इन्गा चिन्ना रसा चा हिंदी रिमेक होता, ज्यात के. भाग्यराज, राधा आणि सीआर सरस्वती यांनी काम केले होते. तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटासाठी पहिली पसंती माधुरी दीक्षित नसून श्रीदेवी होती. सुरुवातीला बोनी कपूर 'बेटा' चित्रपट बनवत होते. त्यांनी सर्वप्रथम श्रीदेवीला लीड लीडची भूमिका ऑफर केली होती, परंतु तिने काही कारणास्तव ती नाकारली. यानंतर चित्रपट निर्माते इंद्र कुमार यांनी चित्रपटाचे हक्क घेतले. 

अन् अरूणा इराणींनी दिला होकार

इंद्र कुमार यांनी 'बेटा'साठी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितला कास्ट केले. या चित्रपटाच्या यशाने माधुरी दीक्षित स्टार बनली. 'बेटा' चित्रपटात अनिल कपूरसोबत माधुरी दीक्षितची केमिस्ट्री धमाल करणारी होती. या चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान मोठी समस्या निर्माण झाली होती. वास्तविक, सरस्वतीच्या भूमिकेसाठी कोणतीही अभिनेत्री तयार होत नव्हती, कारण ती नकारात्मक भूमिका होती. ही ऑफर वहिदा रहमान, शर्मिला टागोर आणि माला सिन्हा यांच्याकडे गेली, पण त्या सर्वांनी ती नाकारली. यानंतर इंद्र कुमार यांनी सरस्वतीच्या भूमिकेसाठी त्यांची बहीण अरुणा इराणीशी बोलले आणि त्यांनी लगेच होकार दिला.

'बेटा'ने जिंकले हे पुरस्कार

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा 'बेटा' रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाने त्यावेळी २३.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'बेटा' ने सर्वोत्कृष्ट अभिनेता (अनिल कपूर), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (माधुरी दीक्षित), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (अरुणा इराणी), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (अनुराधा पौडवाल) आणि सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन (सरोज खान) यासह ५ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते.

टॅग्स :माधुरी दिक्षितश्रीदेवीअनिल कपूरअरुणा इराणी