गीतकार, गायक, संगीतकार, लेखक आणि अभिनेता अशा विविध भूमिकांना योग्य न्याय देणारे व दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे स्वानंद किरकिरे चुंबक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. यानिमित्ताने लोकमतशी विशेष संवाद साधताना ते म्हणाले की, प्रेक्षकांचं मन जिंकण्यात हा सिनेमा खरा उतरेल. अभिनयासाठीची ही आॅफर स्वीकारण्यामागील कारण विचारल्यावर किरकिरे म्हणाले की, जेव्हा दिग्दर्शक संदीप मोदी आणि निर्माते नरेन कुमार भेटायला आले तेव्हा वाटलं चित्रपटासाठी म्युझिकसंबंधी काही चर्चा होईल पण जेव्हा त्यांनी लीड रोल आॅफर केला तेव्हा आशचर्य वाटलं. भूमिकेबद्दल जाणून मी त्वरित हो म्हटलं कारण या भूमिकेसाठी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि अशी सशक्त भूमिका नाकारण्यासारखे काहीच कारण नव्हते.
कथेबद्दल सांगताना किरकिरे म्हणाले की, ते एका ४५ वर्षांच्या 'प्रसन्ना ठोंबरे' या आत्ममग्न माणसाची व्यक्तिरेखा साकारत आहे. ही कहाणी सांगते की कशा प्रकारे १५ वर्षाचा मुलगा बाळू (साहिल जोशी) आणि त्याचा मित्र (संग्राम देसाई) भोळ्याभाबड्या प्रसन्नाला गुंडाळतात. नंतरचे घटनाक्रम आयुष्यात काय योग्य आणि त्याची निवड कशी करायची याबद्दल भाष्य करतात. आणि सौरभ भावे यांच्या याच कथानकानेअक्षय कुमारचे मन जिंकले. सुपरस्टार अक्षय कुमार प्रस्तुत करत असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे यावरून आपण विचार करू शकता की यात नक्कीच काही विशेष असेल. अक्षयला सिनेमा एवढा आवडला की त्यांनी सिनेमाला आणि कलाकारांना भरभरून प्रतिसाद दिला. अक्षयने चित्रपट पाहिल्यानंतर याची प्रस्तुती करण्याचे ठरविले.
स्वानंद किरकिरे पुढे सांगतात की , एका निरागस आणि आत्ममग्न पुरुषाची व्यक्तिरेखा मला साकारायची होती. आपल्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण करत आणि त्याच्या जोडीला या क्षेत्रातील डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याशी चर्चा करत ही व्यक्तिरेखा मी साकारली आहे. ही व्यक्तिरेखा आम्ही एक एक वीट रचावी तशी अभ्यासत आणि साकारात गेलो. डिस्को ची भूमिका साकारणाऱ्या संग्राम देसाईने परराज्यातून आलेल्या आणि मुंबई मोबाईल रिपेअरिंगचे काम करणाऱ्या तरुणाची व्यक्तिरेखा साकारली आहे. कास्टिंग टीममधील रोमिल मोदी आणि तेजस ठक्कर यांना संग्राम कोल्हापूरजवळील एका गावात अगदी अनपेक्षितपणे सापडला. परराज्यातून आलेल्या पण हुशार अशा मोबाइल मेकॅनिकची भूमिका साकारण्यासाठी संग्रामला शहरातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करावा लागला. त्यासाठी तो मुंबईत एक महिना राहिला. त्यासाठी दिग्दर्शक संदीप मोदी आणि लेखक सौरभ भावे यांनी त्याला खूप मदत केली. या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना संग्रामने मोबाईल दुरुस्त करण्याचे थोडे प्रशिक्षणही घेतले. २७ जुलै रोजी 'चुंबक' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.