ऐतिहासिक मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळ्या असतात. पडद्यावरचे दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी अत्यंत नेमकेपणाने दृक् सौंदर्य साकारावे लागते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील आगामी भव्य ऐतिहासिक मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई नववर्षाची प्रेरणादायक सुरुवात करत ४ जानेवारीपासून भेटीला येत आहे. या मालिकेत अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा मांडली आहे. या मालिकेसाठी योग्य दृक् सौंदर्य साकारण्यासठी निर्मात्यांनी तब्बल सहा महीने व्यापक संशोधन केले आणि पुढील सहा महीने अगदी सुरुवातीपासून सेट तयार करण्यात खर्ची केले.
सेट उभारण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर म्हणाले, “हा सेट तयार करताना आमची प्रेरणा होती, १५-१८व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृती. मी यापूर्वी काही पौराणिक मालिकांसाठी काम केलेले आहे पण ही माझी पहिलीच ऐतिहासिक मालिका आहे आणि मी म्हणेन की, हा अगदीच वेगळा अनुभव आहे. पौराणिक मालिकांमध्ये कलात्मक स्वातंत्र्य घेता येते, पण इथे मात्र जास्तत जास्त अचूक आणि नेमके असण्यावर आमचा भर असतो. कारण त्याची सहज तुलना केली जाते. सेट डिझाइन अस्सल दिसण्यासाठी आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पार्श्वभूमीसाठी पडदे आणि महालतील इतर फर्निचरसाठी अस्सल आणि उच्च दर्जाचे महेश्वरी वस्त्र वापरले आहे.”