Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी पासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. मौनी अमावस्येसाठी मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज येथे जमले आहेत. त्यातच चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. यात १९ जणांचा मृत्यू झाला. यातच 'ड्रीम गर्ल' अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी (Hema Malini) महाकुंभात सहभागी झाल्या.
हेमा मालिनी यांनी बुधवारी सकाळी त्रिवेणी संगमात स्नान केले. यावेळी त्यांच्यासोबत योगगुरू बाबा रामदेव आणि जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराजही उपस्थित होते.
पवित्र स्नानानंतर हेमा मालिनी म्हणाल्या, "हे माझं भाग्य आहे. मला असा अनुभव यापूर्वी कधीही आला नव्हता. इतके कोटी लोक इथे आले आहेत. मलाही इथे पवित्र स्नानाची संधी मिळाली". चेंगराचेंगरीबद्दल बोलताना हेमा म्हणाली, 'तिथे खूप गर्दी होती. मी सर्वांना विनंती करते की एकाच वेळी मोठ्या संख्येने येऊ नका. हे खूप दुःखद आहे".
हेमा मालिनी यांच्या आधी गायक गुरु रंधावा, सुनील ग्रोव्हर, रेमो डिसूझा, अनुपम खेर, भाग्यश्री, सिद्धार्थ यांसारख्या सेलिब्रिटींनी महाकुंभात सहभागी होत, संगमात डुबकी घेतली आहे. सनातन धर्मात कुंभाचं विशेष महत्त्व आहे. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे. कुंभमेळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.