नवी दिल्ली - 'बाहुबली' या सुपरहिट सिनेमाचे सुपरहिट दिग्दर्शक एस. एस. राजामौली लवकरच आपला दुसरा बिग बजेट प्रोजेक्ट 'महाभारत' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. जेव्हापासून सिनेमाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून सर्वत्र महाभारताची जोरदार चर्चा सुरू आहे. महाभारत या चित्रपटाची कथा ही एम. टी. वसुदेवन यांच्या Randamoozham या कादंबरीवर आधारीत आहे. या चित्रपटात आमिर खान कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी मुकेश अंबानी 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत.
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ नंतर आमिर खान महाभारत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी या चित्रपटामध्ये 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. एकता कपूरचा नुकताच आलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते. आमिर खानच्या महत्वाच्या महाभारत चित्रपटामध्ये मुकेश अंबानी हे सह-निर्माता असणार आहेत. या वृत्ताला मुकेश अंबानी किंवा आमिर खान यांनी दुजोरा दिला नाही. पण वॉयकॉम 18 या आपल्या जुन्या कंपनीमार्फत मुकेश अंबानी गुंतवणूक करणार की नव्या कंपनीमार्फत करणार हे लवकरच जाहीर होईल.
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि थलायवा रजनीकांत या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात रजनीकांत भीष्म पितामह आणि आमिर कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबतची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. पण आमिर खान आणि रजनीकांत एकत्रित मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले तर नक्की सिनेरसिकांसाठी ही मेजवानीच असेल.
एप्रिलमध्ये 'बाहुबली 2' रिलीज झाल्यानंतर राजामौली त्यांचा अतिमहत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट महाभारताच्या तयारीला लागणार आहेत. राजामौली महाभारतासाठी खूपच उत्साहित असल्याचेही समजत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी सिनेमा तमीळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये डब केला जाणार आहे.