छोट्या पडद्यावर 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांनी एक काळ गाजवला आहे. या मालिकांच्या वेळी रस्त्यावर अक्षरश: शुकशुकाट असायचा आणि घराघरात फक्त या दोन्ही मालिका पाहायला जायच्या. मालिकेतील प्रत्येक पात्राला भरभरुन प्रेम मिळालं. दरम्यान 'महाभारत' मधील शकुनी मामाचे पात्र साकारणारे अभिनेते गूफी पेंटल (Gufi Paintal) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गूफी पेंटल यांच्या निधनाची बातमी दिली. गेल्या काही दिवसांपासून गुफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. हृदय आणि किडनीच्या विकाराने ते त्रस्त होते. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
गुफी पेंटल यांचं पूर्ण नाव सरबजीत गूफी पेंटल असं आहे. त्यांनी 'महाभारत' शिवाय 'कानून', 'सौदा', 'अकबर बिरबल', 'ओम नम: शिवाय', 'मिसेस कौशिक की पाच बहुए', 'कर्ण संगिनी', 'जय कन्हैय्या लाल की' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी 'रफू चक्कर', 'देस परदेस', 'दावा', 'घूम' सारख्या काही हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.