अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) व सपा नेतो फहाद अहमद (Fahad Ahamd) याचं लग्न सध्या जाम चर्चेत आहे. स्वरा व फहादने गुपचूप लग्न उरकत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तूर्तास एकीकडे स्वरावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय, दुसरीकडे या आंतरधर्मीय विवाहानंतर तिच्यावर टीकाही होताना दिसतेय. अयोध्येचे महंत राजू दास यांनी स्वरा भास्करच्या लग्नावर वादग्रस्त विधान केलं आहे.
काय म्हणाले महंत राजू दास?
“स्वरा भास्कर जर एक सशक्त महिला असती तर तिने त्या धर्मात लग्न केलंच नसतं. तिने अशा समाजातील व्यक्तीशी लग्न केलं आहे, जिथे भाऊ-बहिणी लग्न करतात आणि त्यानंतर तलाक, तलाक, तलाक म्हणत त्यांना सोडलं जातं. मग अनेक पुरुषांसोबत त्यांना रात्र काढावी लागते. स्वरा भास्करला असंच राहायचं असेल तिला शुभेच्छा आहेत. स्वरा १० दिवसांपूर्वी त्या मुलाला भाऊ म्हणते. भावा, एखाद्या मुलीशी लग्न कर, असं त्याला सुचवते आणि १० दिवसांनतर त्याच मुलाशी लग्न करते. मला कोणत्याही महिलेचा वा धर्माचा अपमान करायचा नाही. पण हिंदू धर्मात सती प्रथेसारखी कुप्रथा संपुष्टात आली आहे. त्याचप्रमाणे इस्लाममध्येही हलाला सारखी क्रूप्रथा संपुष्टात यायला हवी. यातून गेलेल्या महिलाच याचं दु:ख समजू शकतात,” असं महंत राजू दास म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) नेत्या साध्वी प्राची यांनी देखील याआधी स्वरा भास्करवर टीका केली आहे. ‘स्वरा भास्कर ही नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात होती. हिंदू धर्मातील व्यक्तीशी ती लग्न करणार नाही याची मला खात्रीच होती. तसंच झालं. तिनं एका मुस्लिमाशी लग्न केलं. श्रद्धा वालकरची बातमी कदाचित तिनं वाचली नसेल किंवा ३५ तुकड्यांबद्दल तिला माहीत नसेल. जे श्रद्धाचं ते स्वराचंही होऊ शकतं,' असं साध्वी प्राची म्हणाल्या होत्या.
स्वरा व फहादने जानेवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी १६ फेब्रुवारीला साखरपुडा केला. आता मार्च महिन्यात ते थाटामाटात लग्न करणार आहेत.