आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून नेहमीच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने श्रमदान केले जाते. या श्रमदानाला विविध राज्यातून लोक हजेरी लावतात. त्याचसोबत बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळी देखील या कामासाठी आपला हातभार लावत असतात. आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावने या वर्षी देखील महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने श्रमदान केले. त्यांच्यासोबत अनेक जलमित्रांनी देखील श्रमदानात आपला हातभार लावला. आमिरच्या पाणी फाऊंडेशन द्वारे आयोजित केलेल्या या उपक्रमात अनेकजण सहभागी झाले होते.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सकाळीच आमिर खान आणि किरण राव यांनी कोरेगाव जिल्ह्यातील चिलवाडी येथे श्रमदान केले. आमिरला आणि त्याच्या पत्नीला आपल्या गावात आल्याचे पाहून गावातील मंडळींना प्रचंड आनंद झाला होता. या गावातील लोकांनी या दोघांचे खूपच चांगल्याप्रकारे स्वागत केले. गावकऱ्यांनी स्वागत केल्यानंतर आमिर आणि त्याची पत्नी कामाला लागले. त्यांचा हा उत्साह पाहून गावातील मंडळीमध्ये देखील उत्साह निर्माण झाला होता आणि सगळ्यांनी मिळून श्रमदान केले.
आमिर गेल्या काही दिवसांपासून पाणी फाऊंडेशनचे काम करत आहे. नुकतात तो या कामासाठी जवालार्जून या गावात गेला होता. त्यावेळी या फाऊंडेशनमधील अनेक मंडळी त्याच्यासोबत होती. यावेळी त्याने रस्त्यात गाडी थांबवून उसाच्या रसावर ताव मारला होता. त्यानेच यातील काही फोटो त्याच्या सोशल नेटवर्किंग साईटवर टाकले होते.
दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आमिर खान आणि त्याचे पाणी फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. तो या कामासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये फिरत असून त्याने अनेक छोट्या छोट्या गावांना देखील भेटी दिल्या आहेत.
आमिर सध्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर काम करत असून हा आगामी चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.