'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. रणदीप हूडाने वीर सावरकरांच्या भूमिकेत केलेल्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतंय. नितीन गडकरींपासून अनेक राजकीय नेत्यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं कौतुक केलंय. अशातच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा काल मुंबईत खास प्रिमियर झाला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी फडणविसांनी राहुल गांधींना चांगलाच टोला लगावला.
प्रिमियरच्या वेळी मीडियाकडून 'राहुल गांधींना तुम्ही सिनेमा बघण्यासाठी कसं आवाहन कराल', असा प्रश्न फडणविसांना विचारण्यात आला. उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वाचलं नाही किंवा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळेच ते त्यांच्याबद्दल चुकीची विधानं करतात. मी राहुल गांधींचा यासाठी विरोध करतो. मी त्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करतो आणि त्यांची इच्छा असेल तर मी माझ्या पैशाने त्यांच्या एकट्यासाठी संपूर्ण थिएटर बुक करेन. यामुळे कदाचित मग ते सावरकरांबद्दल निराधार विधाने करणं थांबवतील."
अशाप्रकारे फडणविसांनी राहुल गांधींवर टिकास्त्र सोडलं. काल मुंबईत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा जो खास प्रिमियर झाला त्याला सिनेमातले प्रमुख कलाकार रणदीप हूडा, अंकीता लोखंडेही उपस्थित होते. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा कमाईच्या बाबतीत सुद्धा हळूहळू चांगली कामगिरी करत आहे. एक आठवडा उलटून गेल्यावर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने १५ कोटींहून जास्त गल्ला जमवला आहे.