बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे ही सध्या तूफान चर्चेत आहे. शुक्रवारी पूनम पांडेचा गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तिच्या निधनामुळे चाहत्यांसह बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. पण, तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. अखेर शेवटी पूनम पांडे हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांनाच धक्का देत जिवंत असल्याचं सांगितलं. यानंतर आता निधनाची अफवा पसरवणाऱ्या पूनम पांडेविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सर्व्हायकल कॅन्सर या गंभीर आजाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मृत्यूचं हे नाटक रचल्याचं कबूल केलं. यानंतर मात्र सोशल मीडियावर तिला लोकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. फक्त फिल्मी जगातामधील नाही तर इतर क्षेत्रातील लोकांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी मुंबई पोलिसांना पूनम पांडेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्यजित तांबे यांनी एक्स (पुर्वीचे ट्विटवर) वर चारू प्रज्ञा नावाच्या वकिलाची पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केले आहे.
यासोबतच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसीएशननेही पूनमवर कायदेशीर कारवाई होऊन तिच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन जारी केले आहे. तसेच देशातील प्रत्येक सामान्य नागरिक, नेटकरी सध्या पूनमवर कारवाई व्हावी अशीच मागणी करत आहेत. स्वतःच्या आर्थिक लाभासाठी अशा रीतीने लोकांच्या भावनांचा अपमान करणाऱ्या पूनमविरोधात सध्या सोशल मीडियावर जोरदार टीका होताना दिसत आहे. हे प्रकरण पूनमला चांगलेच भोवणार असल्याचं दिसून येत आहे. कारवाई झाल्यास तिच्यावर तुरूगांत जाण्याचीही वेळ येऊ शकते.