सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार, १ मे पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयाचं लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) हिने स्वागत केली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नावात बदल केल्याचं सांगितलं आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम समाजात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत असते. यावेळी तिने राज्य सरकारच्या निर्णयाचं कौतुक करत महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे (aditi tatkare) यांचे आभार मानले आहेत.
काय आहे प्राजक्ताची पोस्ट?
"नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी. काय झालं? अहो, हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे. अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे.“ आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे, आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री “अदिती वरदा सुनील तटकरे “ ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावा आधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट....."
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे 2024 पासून करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की, 1 मे, 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व मुला-मुलींच्या नावाची नोंद मुलाचे नाव- आईचे नाव- वडिलांचे नाव- आडनाव अशा स्वरूपात नोंद करणे बंधनकारक असणार आहे.